ठाणे : ठाणे शहरामध्ये कोरोनाबाधित रग्णांची संख्या वाढत आहे ही वस्तुस्थिती असली तरीही मृत्यूदर कमी करण्यावर भर देण्यात यावा, कोमॉर्बिड पेशन्टस् तसेच 50 वर्षांवरील रुग्णांची विशेष काळजी घ्यावी व यासाठी तज्ञ डॉक्टरांची वेगळी यंत्रणा निर्माण करण्याचे आदेश देतानाच राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी नगरसेवक, प्रभाग अधिकारी, स्थानिक पोलिस आणि स्वयंसेवी संस्थांचा समावेश असलेली एक समिती तयार करण्याच्या सूचना दिल्या.
कोव्हीड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि त्यानुषंगाने उपाययोजना निश्चित करण्यासाठी ना. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी महापौर नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, आमदार प्रमोद पाटील, आमदार ॲड. निरंजन डावखरे, उपमहापौर सौ.पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेता अशोक वैती, विरोधी पक्षनेत्या सौ.प्रमिला मुकुंद केणी, महापालिका आयुक्त विजय सिंघल, ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला, संजय वाघुले आदी उपस्थित होते.
आज सकाळी महापालिकेच्या कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये ना. एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील कोरोना कोव्हीड-19 परिस्थितीचा आढावा घेऊन कोरोनामुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण जास्त असून ते कसे कमी करता येईल यावर भर देण्याच्या सूचना दिल्या. तसेच कोमॉर्बिड रुग्ण आणि 50 वर्षांवरील कोरोना कोव्हीड-19 रुग्णांची विशेष काळजी घेण्याच्या सुचना दिल्या.
शहरातील कोरोना कोव्हीड-19 बाधितांची संख्या नियंत्रित करण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याबरोबरच प्रभाग समितीनिहाय स्थानिक पातळीवर स्थानिक नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, स्थानिक पोलिस व प्रभाग अधिकारी यांचा विशेष गट स्थापन करुन सोशल डिस्टन्सींग, कोरोना सदृष्य व्यक्तींची माहिती घेणे, अनोळखी व्यक्तींचा शोध घेणे आणि त्या अनुषंगाने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणे याबाबत ही समिती करु शकेल असेही ना. शिंदे यांनी या बैठकीत सांगितले.
शहरातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जी खाजगी रुग्णालये निश्चित करण्यात आली आहेत. त्या रुग्णालयाच्या दर्शनी भागावर रुग्णांसाठी निश्चित करण्यात आलेल्या दरांचा तक्ता लावण्यात यावा असे सांगून ना.शिंदे यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने आणि एकदिलाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
प्रारंभी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी कोरोना कोव्हीड-19 ची ठाणे शहराची सद्य:स्थिती काय आहे तसेच महापालिका काय उपाययोजना करीत आहे याची माहिती दिली.