अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन एप्रिलमध्येः स्वामी गोविंदगिरी


अहमदनगर: अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन येत्या ३० एप्रिल रोजी करण्याचा विचार आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी आज दिली.


येत्या ४ एप्रिल रोजी अयोध्येत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक होणार असून त्यावेळी भूमिपूजनाबाबतचा निर्णय होणार घेण्यात येणार आहे. मात्र, ३० एप्रिल रोजीच भूमिपूजन सोहळा पार पडेल, अशी आजची स्थिती आहे, असेही स्वामी म्हणाले.


श्रीराम मंदिराचे भूमिपूजन पूर्णपणे वैदिक पद्धतीने होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असेही स्वामींनी सांगितलं. श्रीराम जन्मभूमी मंदिराचा सध्याचा जो आराखडा आहे तो ९०% स्वीकारला गेला आहे.


त्यात अजून मंदिराची भव्यता करण्याचे नियोजन आहे. तीन वर्षात मंदिर उभारणीचे लक्ष्य आहे. यासाठी निधी संकलन लवकरच सुरू होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अयोध्या खाते उघडल्यानंतर निधी संकलन सुरू होईल. अयोध्येतील राम मंदिर पूर्णपणे पाषाणात होणार असून भारतीय संस्कृतीचे संस्कार केंद्र व विश्व संस्कार राजधानी म्हणून या निमित्ताने अयोध्येचा विकास करण्याचे मंदिर न्यास समितीचे नियोजन आहे, असेही त्यांनी सांगितले.


बाळासाहेब ठाकरे यांना आनंदच झाला असेल.


शिवसेनेचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे राम मंदिरासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. ठाकरे यांच्या या घोषणेचे स्वामींनी स्वागत केले. मंदिरासाठी पहिली देणगी तिरुपती बालाजी व्यंकटेश मंदिराने दिली. तिरुपती बालाजीने १०० कोटींची  पहिली देणगी दिली आहे. आणखी एका देवस्थानने १० कोटी रुपये दिले आहेत. शिवसेनेने दिलेल्या देणगीमुळे बाळासाहेब ठाकरे यांना खूप आनंद झाला असेल, अशी भावनाही स्वामींनी व्यक्त केली. महाराष्ट्रातून अयोध्यात येणाऱ्या भाविकांसाठी तेथे महाराष्ट्र भवन होणार असेल, तर त्याचा मला महाराष्ट्राचा रहिवासी म्हणून आनंद आहे. अयोध्येत असे प्रत्येक राज्याचे भवन झाल्यास ती देशाची सांस्कृतिक राजधानी नक्कीच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.