हळदीची होळी, खंडोबा मंदिर, जेजुरी
पुणे जिल्ह्यातील खंडोबाचे हे देवस्थान आहे. हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु आता जेजुरी या ठिकाणी नव्याने बांधलेले देऊळ आहे. तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे (इ.स.1712) देऊळ आहे. मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो. औरंगजेबाने 1,25,000 चांदीच्या मोहरा देऊन, या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबालाच साकडे घातले, असाही उल्लेख सापडतो. देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत. सुमारे 200 पाय-या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. नवलाख पायरीचा (नऊ लाख पाय-या) डोंगर असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हटले जाते. देऊळ अतिशय सुंदर आहे. सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत. देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो. उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचललेली ठेवणा-या व्यक्तीला बक्षिस देण्याची पद्धत आहे. दस-याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते. तसेच सोमवती अमावास्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.
जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. धनगर, आगरी, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत असून इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. बळीराज्याच्य काळात खंडोबा हे एका खंडाचे मुख्य होते. लोकदेव खंंडोबा व लोकदेव विठोबा हे महाराष्ट्राच्या घराघरात रुजलेली दैवत आहेत.निसर्गाच्या सन्निध्यात नैसर्गिक रित्या वाढणाऱ्या वास्तूकलेचे जेजुरीचा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा, व कमानी उभारल्या आहेत. या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहायला मिळतात.
देऊळ
जेजुरीचे शिखर व समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता. दुर्दैवाने शिखर-शिंगणापूर तीर्थक्षेत्राप्रमाणेच येथेही दाक्षिणात्य शैलीचे या वास्तूशी पूर्ण विशोभित शिखर नव्याने बांधण्यात आले आहे. देवळाच्या ओवऱ्या व समोरचा ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत.ग
वळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे. यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात. चांगभले खंडोबांचा येळकोट असा जयघोष करीत या भंडाऱ्यांची उधळण होते. तळी भरणे हा एक विधी असतो. ताटात खोबरे व भंडारा घ्यावयाचा, पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यावयाची व मग खोबऱ्याची उधळण करावयाची.
खंडोबा ही सकाम देवता आहे. नाना फडणवीस यांनी नवसाप्रीत्यर्थ एक लाख रुपये देवाला वाहिले होते. पंचवीस हजाराच्या मूर्ती केल्या, दगडी मंडपी रुप्याने मढवली व उरलेल्या रकमेतून सोन्याचे मुखवटे वगैरे सामग्री वाहिली. मंदिरात चांदी-पितळेचे तीन मूर्ति-जोड होते. एक सोन्याचा जोड इ.स. १९४२ च्या सुमारास चोरीला गेला; बाकी शिल्लक आहेत.
खंडोबाची यात्रा व जत्रा
खंडोबाच्या यात्रा व जत्रा चैत्र, पौष व माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी असे सहा, वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व आश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस असतात. देवास वाहिलेल्या मुला-मुलींचे वाघ्या-मुरळींत रूपांतर होते. कावडी घालणे किंवा नियत संख्येच्या पाण्याच्या कावडी वाहणे, वाघ्या-मुरळींकडून जागरण किंवा तळी भरणे-उचलणे, बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा घालणे, लंगर साखळी तोडणे, वारी किंवा भीक मागणे व हाळावरून (विस्तवारून) चालणे अशा अनेक प्रकारे नवसपूर्ती करण्यात येते. पौषी व माघी पौर्णिमांच्या यात्रांसाठी वऱ्हाड, खानदेश, कोकण इत्यादी भागांतून उपासक येतात. खैरे, होलम व होळकर यांच्या काठ्या म्हणजे लाल पागोट्याचे फडके गुंडाळलेले उंच कळक मिरवणुकीने वद्य द्वितीयेस कोटात येतात व शिखरास स्पर्श करून आपापल्या गावी परत जातात. नवरात्रातही देवाचा मोठा उत्सव असतो. जेजुरीस अनेक भक्तगण महाराष्ट्रातून नियमाने येतात व खंडोबाच्या कृपेने यात्रेत संतुष्ट होऊन परत फिरतात.
खंडोबा ज्या ठिकाणी स्थायिक आहे ते ठिकाण अणदूर (नळदुर्ग) (उस्मानाबाद), जेजुरी (पुणे), देवरगुड्डा (राणीबेन्नूर), निमगाव धावडी (पुणे), पाली (सातारा), मंगसुळी (बेळगाव), माळेगाव (नांदेड), आदि मैलार (बिदर), मैलारपूर (यादगीर) (गुलबर्गा), मैलार लिंगप्पा (खानापूर) (बेल्लारी), शेगुड (अहमदनगर), सातारे (औरंगाबाद)
खंडोबा किंवा खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत आहे. हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. प्रामुख्याने गोसावी, मल्हारकोळी, मातंग, मराठा, सोनकोळी, वैती, आगरी, गवळी, माळी, कुणबी, भंडारी, वाडवळ, खारवी, भोई, कराडी, रामोशी (नाईक), धनगर समाजाचे, तसेच कित्येक ब्राम्हण व प्रभु समाजातील लोकांचे कुलदैवत मानले जाते. परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बाणाई या पत्नी; हेगडे हा प्रधान (हा बाणाईचा भाऊ आहे) आणि कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो.खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा (अतिशय मोठी आणि जड तलवार) आणि पानपत्र असून तो चतुर्भुज व कपाळाला भंडारा लावलेल्या रूपात असतो.
चंपा षष्ठीच्या दिवशीची जेजुरीच्या खंडोबाच्या देवळातली हळदीची उधळण
एका मतानुसार खंडोबा हे नाव या देवतेच्या खंडा (संस्कृत खड्ग -> मराठी खंडा) या शस्त्रावरून आले आहे. दुसर्या मतानुसार हा संस्कृत स्कंद शब्दाचा अपभंश आहे. (स्कंद -> स्कंदोबा -> खंडोबा) याखेरीज मल्हारी(मल्लारी), खंडेराय, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, रवळनाथ, येळकोटी(येळ=सात,सात कोटी सैन्य असलेला) ही खंडोबाची इतर नावे होत. मल्लू खान आणि अजमत खान (अजमत = चमत्कार) ही नावे खंडोबाच्या मुसलमान भक्तांमध्ये लोकप्रिय आहेत. ते खंडोबाच्या खंडा शस्त्रास मल्लू खान की गदा अशा नावाने संबोधतात. मल्ह / मल्ल + अरी अशी मल्हारी शब्दाची फोड असून मल्ल राक्षसाचा शत्रू असा त्याचा अर्थ आहे. म्हाळसेचा पती म्हणून खंडोबास म्हाळसाकांत असे म्हणतात. येळकोटी म्हणजे सात कोटी सैनिकांचा नायक. खंडेराय (राय = राजा) हे नावही खंडोबाचे राजेपण दर्शविते.कर्नाटकात खंडोबास मैलार किंवा खंडू गौडा (स्वैरपणे: खंडू पाटील) तर आंध्रात मल्लाण्णा नावाने ओळखतात.
मल्हार हा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचा लोकप्रिय असा कुलस्वामी(कुलदैवत) आहे. खंडोबाचेही ते एक नाव आहे. खंडोबा हा शंकराचा अवतार समजला जातो. मल्लासुर दैत्याचा संहार केला, मल्लाची हार झाली म्हणून मल्ल + हार अशा रितीने मल्हार हे नाव मिळाले असावे. "येळकोट येळकोट जय मल्हार" असा या देवाचा जयघोष केला जातो. मल्हारी मार्तंड (मल्लारिमार्तंड) असेही नामाभिधान आहे. मूळ संस्कृतमध्ये या नावाचा उच्चार "मल्लार" असा आहे.
खंडोबा म्हाळसा मणिमल्लांचा संहार करताना (मूळ शिळाचित्राचे साल - १८८०)
खंडोबा हे दैवत अकराव्या शतकापासून लोकप्रिय झाले असावे.खंडोबाचे ऐतिहासिक उल्लेख चौदाव्या शतकापासून येतात. खंडोबावरील सर्वाधिक महत्त्वाचा ग्रंथ मल्हारी माहात्म्य सांगतो की मल्हारीचा निर्देश ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रकांडात केला आहे. पण या पुराणाच्या प्रमाण आवृत्तीत याचा उल्लेख मिळत नाही.मूळचे लोकदैवत असलेल्या खंडोबाचे क्रमश: वैदिकीकरण झाल्याचे दिसते. लोककथा या देवतेस पौराणिक शिव व वैदिक रुद्र यांचा पूर्णावतार मानतात. खंडोबाच्या परिवारातील इतर सदस्यांचेंही वैदिकीकरण झाले आहे. यामुळे म्हाळसा बाणाई या पार्वती व गंगा यांच्या, रक्त पिणारा खंडोबाचा कुत्रा कृष्णाचा तर शुभ्र घोडा नंदीचा अवतार मानला गेला.खंडोबा हे दैवत वैदिक पशुपती रुद्राप्रमाणे दरोडेखोर, घोडा आणि कुत्रा यांच्याशी संबंधित आहे. खंडोबाचा भक्तिपंथ किमान बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे. महानुभाव पंथीय चक्रधर स्वामींनी खंडोबाचा उल्लेख केला आहे. आंध्राच्या काकटीय सम्राटांचे खंडोबा हे कुलदैवत होते. मल्हारी माहात्म्य ग्रंथातील प्रेमपुरी जागा कर्नाटकातील बिदरजवळचे आदी मैलार स्थान आहे असे मानले जाते. आदी मैलार खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानांमध्ये मोडते. मराठी परंपरेने मूळचा प्रेमपुरीचा खंडोबा प्रेमपुरी -> नळदुर्ग -> पाली (जि. सातारा) असे करत जेजुरीस स्थिरावला.मराठी परंपरेत खंडोबा कानडी देव मानला जात असल्याचे संशोधक सोन्थेमर सांगतात. दख्खनच्या लिंगायत, जैन व इतर व्यापार्यांनी खंडोबा पंथाचा प्रसार केला असावा. पैठणच्या मराठी कंडक यक्षाशीही या देवतेचे एकीकरण झाले आहे.महात्मा फुले यांनी खंडोबा देवतेस बळीराजाच्या राज्यातील महाराष्ट्र क्षेत्राचा अधिपती मानले आहे. महाराष्ट्र क्षेत्र विस्ताराने मोठे असल्याने बळीराजाने या प्रदेशाचे नऊ खंड केले. जेजुरीचा क्षेत्रपती असणारा खंडोबा त्यातील एक होय. खंडोबाचे मार्तंड हे नाव "मार-तोंड" यावरून आले असल्याचे त्यांचे मत आहे.जेजुरीचे मंदिर वीरपाल वीरमल्ल याने इ.स. १३८१ साली बांधले. १६३५ साली खटावच्या राघो मंबाजीने याचा विस्तार केला.बंगाली संत चैतन्य महाप्रभू यांनी या मंदिरास भेट दिली होती व मुरळींचा वेश्याव्यवसाय बंद करण्याचे प्रय्त्न केले होते; असे ऐतिहासिक उल्लेख आहेत. जेजुरी गडावरील शिलालेखांत विठ्ठल सदाशिव विंचूरकर, मल्हारराव होळकर वगैरेंचे उल्लेख येतात. नारायणरावाच्या हत्येनंतर नाना फडणीस यांनी नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हीस पुत्र झाल्यास एक लाख अर्पण करू असा नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यामुळे पेशवे दरबाराकडून विविध रूपात हा नवस फेडला गेला.
खंडोबाची प्रतिके
खंडोबाची प्रतिके विविध आहेत. लिंग,तांदळा, मूर्ती, टांक ही प्रतिके आज रूढ आहेत.
कुळाचार
हे दैवत अनेक कुटुंबांचे कुलदैवत असल्याने विविध कुळाचारात खंडोबास स्थान आहे.
जागरण - गोंधळ
देवतेची गीतांमधून स्तुती असे या आचाराचे स्वरूप असते. अनेक मराठी कुटुंबांमध्ये लग्नानंतर गोंधळ घालण्याची प्रथा आहे.
तळी भरणे
तळीभरण हा नैमित्तिक स्वरूपाचा कुळाचार आहे. यात पाच पुरुषांद्वारे बेल, भंडारा ,सुपारीने देवतेला ओवाळले जाते. शेवटी तीन वेळा थाळी उचलून वरखाली करताना सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचे चांगभले असा जयजयकार करतात. मराठीतील तळी उचलणे हा समर्थन करणे या अर्थाचा वाक्प्रचार या आचारावरूनच आला असावा.
तळी भंडार
आगडदुम नगारा सोन्याची जेजुरी
निळा घोडा ,पाव में तोडा|
मस्तकी तुरा, बेंबी हिरा |
अंगावर शाल, सदाही लाल |
म्हाळसा सुंदरी , आरती करी |
खोबऱ्याचा कुटका, भंडाऱ्याचा भंडका
बोला सदा आनंदाचा येळकोट |
खंडेराव महाराजकी जय |
हर हर महादेव
चिंतामणी मोरया
आनंदीचा उदय उदय
भैरीचा चांग भले
सदानंदाचा येळकोट
खंडेराव महाराज की जय |
हर हर महादेव |
चिंतामणी मोरया |
चिंतामणी मोरया |
आनंदाचा उदय उदय|
भैरीचा चांग बले |
सदानंदाचा येळकोट
खंडेराव महाराज कि जय |
बेल, भंडारा, दवणा यांना खंडोबाच्या पूजेत महत्त्व असून कांदा त्यास आधिक प्रिय आहे. त्यास मांसाचाही नैवद्य दाखवितात.याशिवाय रगडा, भरीत आणि पुरणपोळीचाही नैवद्य दाखविता खंडोबाचे उपासक ब्राह्मणांपासून लिंगायत, धनगर, मातंग, मराठा अशा सर्व जातींमध्ये आढळतात. हे दैवत सकाम दैवत असल्याने त्याला अनेक नवस केले जातात.एक वाघ्या - खंडोबाला वाहिलेल्या पुरुषास वाघ्या तर स्त्रीस मुरळी असे म्हणतात.खंडोबा हे दैवत बहुपत्नीक आहे. खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्नीकत्वामुळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्नी बाणाई (वा पालाई)
खंडोबाच्या सध्य स्थिती
सध्या खंडोबा मंदिर 9 लाख आपण पायऱ्यांच्या असलेले बोलतो पण ते तस नाही कारण त्या काळात एकूण 9 लाख दगडांच्या वापर केलेला आपल्याला आढळतात.कठेपठार ला जात ना मध्ये श्री राम मंदिर आहे त्या ठिकाणी पाली भाषेत लेख लिहलेला आहे कमानीच्या वर ती फारशी लावलेली आहे. सध्या गडावर शोभीकरणाचे काम चालू आहे. पक्षी अभयारण्य च ही काम चालू आहे. गडावर जाताना ऐकून 8 ते 9 कमानी लागतात त्या आता अर्धवट असलेले आपल्याला दिसतात.ज्या ठिकाणी श्री शहाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज ह्याची अडीच पायऱ्यांवर भेट झाली ते देखील ह्या ठिकाणी आहे नक्की अनुभवण्यासारखं आहे.