चतुरस्त्र लेखक, गूढकथाकार, नाटककार, विचारवंत रत्नाकर मतकरी यांचे दुःखद निधन

 


मुंबई – मराठी साहित्यात चौफेर योगदान देणारे गूढकथा लेखक, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, चित्रकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व रत्‍नाकर रामकृष्ण मतकरी (वय 81) यांचे आज काल (रविवारी) रात्री निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
रत्नाकर मतकरी यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1938 रोजी मुंबईत झाला. 1955 मध्ये म्हणजे त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षी, रत्नाकर मतकरी यांची एकांकिका ‘वेडी माणसं’ ही, आकाशवाणी मुंबई केंद्रावरून ध्वनिक्षेपित झाली. तेव्हापासून अगदी गेल्या काही दिवसांपर्यंत अव्याहतपणे त्यांचे लेखन चालू होते. वयाची 80 वर्षे ओलांडल्यानंतरही त्यांचे नवे लिखाण वाचावयास मिळत होते. त्यांची भाषणे ऐकावयास मिळत होती, त्यांची नवीन नाटके रंगभूमीवर येत होती, आणि नवीन पुस्तके प्रकाशित होत होती, हे या प्रदीर्घ, सातत्यपूर्ण, समृद्ध कला-कारकिर्दीचे वैशिष्ट्य. साहित्यिक, संपूर्ण रंगकर्मी, दूरदर्शन-चित्रपट या माध्यमातील लेखक-दिग्दर्शक, निर्माता, स्वयंशिक्षित चित्रकार, असे त्यांच्या कलावंत व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू होते.


नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक लेख अशा नानाविध साहित्य प्रकारात त्यांनी दर्जेदार लेखन केले. मराठी रंगभूमीवरील नव्या पर्वाच्या जडण-घडणीतले एक शिल्पकार, असे त्यांचे सार्थपणे वर्णन करता येईल.व्यावसायिक, प्रायोगिक आणि बालनाट्य अशी रंगभूमीची तिन्ही दालने हे त्यांचे कार्यक्षेत्र राहिले. तिथली त्यांची कामगिरी, नाट्यलेखन, दिग्दर्शन, नेपथ्य आणि संगीत यांचे संकल्पन, वेशभूषा रेखाटन, अभिनय, तसेच निर्मिती अशी सर्वांगीण स्वरूपाची आहे. ‘बालनाट्य’, ‘सूत्रधार’ आणि ‘महाद्वार’ या आपल्या नाट्य संस्थांच्या द्वारे त्यांनी, प्रतिभा मतकरी या कलावंत पत्नीच्या साहाय्याने रंगभूमीच्या क्षेत्रात केलेले निरपेक्ष, निष्ठापूर्ण कार्य लक्षणीय आणि मोलाचे होते. त्यांचे चित्रकार असणे ही गोष्ट साहित्य, रंगभूमी आणि इतर कला माध्यमे, यातील त्यांच्या निर्मितीसाठी लाभदायक ठरली.


प्रयोगशीलता, निर्मितीची अथक ऊर्जा, चैतन्य, उपक्रमशीलता, तसेच अंतर्मुखता आणि समाजाभिमुखता यांचे संतुलन, हे मतकरींच्या कलावंत-व्यक्तिमत्त्वाचे खास वैशिष्ट्य होते. कमीत कमी साधनांच्या आधारे निर्मिती करणे आणि त्याद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे, हे ही त्यांच्या सृजनशीलतेचे एक मर्म होते.


कलावंत मतकरींना आजवर अनेक पुरस्कार व मानसन्मान लाभलेले आहेत. तथापि मराठी (आणि अन्य भाषिक) रसिकांनी मतकरींच्या साहित्यावर जो लोभ केला, तो त्यांना मिळालेला सर्वाधिक मोलाचा पुरस्कार म्हणता येईल. त्यांची ‘दुभंग’, ‘अश्‍वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘घर तिघांचं हवं!’ ‘खोल खोल पाणी’ ही नाटके नाट्यरसिकांच्या मनात कायम घर करून आहेत. ‘चार दिवस प्रेमाचे’ या संगीत नाटकाचे 1000 च्या वर प्रयोग झाले,आणि हिंदी व गुजराती भाषांमध्येही ते यशस्वी झाले. तसेच, अलिकडच्या ‘सुखान्त’ या नाटकाचे गुजराती रुपांतर ‘वारस’ हे ही अत्यंत यशस्वी ठरले.


समांतर रंगभूमीवर ‘प्रेमकहाणी’ आणि ‘आरण्यक’ यांना मानाचे स्थान मिळाले, तर ‘लोककथा’78’ हे, आशय, आकार इत्यादी अनेक कारणांसाठी महत्त्वाचे ठरले.मराठी आणि हिंदी भाषांत त्यांचे प्रयोग अजूनही होत असतात. ‘निम्माशिम्मा राक्षस’, ‘अलबत्या गलबत्या’, ‘अचाट गावची अफाट मावशी’ या बालनाटकांशी दोन पिढ्यांचे बाल्य निगडित आहे. वास्तवाचे भान ठेवणार्‍या गूढकथा, हा कथाप्रकार वाचकांपर्यंत त्यांनी एकहाती पोहोचवला. वयाच्या सोळाव्या वर्षापासून अथकपणे कार्यरत राहिलेला हा लेखक- दिग्दर्शक, हे मराठी साहित्य आणि रंगभूमी या दोन्हींना कवेत घेणारे एक अपवादात्मक बहुरंगी व्यक्तिमत्त्व होते.


मतकरी हे नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार देखील आहेत. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करून बालनाट्यांची निर्मिती केली. झोपडपट्टीतीतील मुलांना त्यांनी ’नाटक’ शिकवले.


2001 साली पुण्यामध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.


रत्नाक्षरं ग्रंथ


रत्‍नाकर मतकरींचा ‘रत्‍नाक्षरं’ हा ग्रंथ चार भागांत विभागला गेला आहे. पहिल्या विभागात एक अस्वस्थ कलावंत, एक माणूस कलावंत, मतकरी : लेखन प्रपंच या मुलाखतींचा समावेश करण्यात आला आहे.


दुसऱ्या विभागात मतकरींच्या कथा, एकांकिका, नाटके, कादंबऱ्या, लेख, कविता, प्रस्तावना, पत्रे, अर्पणपत्रिका या साहित्य-प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.


तिसऱ्या विभागात मान्यवर मंडळींना मतकरी कसे वाटतात यावरील लेखनप्रपंचांचा समावेश करण्यात आला आहे.
चौथ्या विभागात मतकरींच्या संपूर्ण साहित्याच्या (संग्रहित आणि असंग्रहित) आणि नाट्यप्रयोगांच्या तपशिलांची दीर्घ सूचीही दिलेली आहे.


अचाटगावची अफाट मावशी (बालसाहित्य)


अजून यौवनात मी (नाटक)


अ‍ॅडम


अंतर्बाह्य


अपरात्र (कथासंग्रह)


अलबत्या गलबत्या (नाटक, बालसाहित्य)


अलिबाबाचं खेचर एकोणचाळीसावा चोर (बालसाहित्य)


अलल् घुर्र घुर्र (बालसाहित्य)


अंश (कथासंग्रह)


आचार्य सर्वज्ञ (नाटक, बालसाहित्य)


आत्मनेपदी (लेखकाने स्वतःच्या घडणीबद्दल, लिखाणाबद्दल, नाट्यचळवळीबद्दल, स्वतःवर प्रभाव टाकणाऱ्या माणसांबद्दल लिहिलेले मनोगत)


आम्हाला वेगळं व्हायचंय (नाटक)


आरण्यक (महाभारतावरील कथानकावर आधारित नाटक. या नाटकाच्या पुस्तकाला दुर्गा भागवत यांची प्रस्तावना आहे.)


आरशाचा राक्षस (बालनाट्य)


इंदिरा (नाटक, लेखन आणि दिग्दर्शन – रत्‍नाकर मतकरी)


इन्व्हेस्टमेंट (या कथासंग्रहातील ’इन्व्हेस्टमेंट’ या कथेवर याच नावाचा मराठी चित्रपट आहे.)


एकदा पहावं करून (मूळ इंग्रजी नाटकाचा स्वैर अनुवाद असलेले नाटक, गुजराथीत हे नाटक ’बे लालना राजा’ या नावाने रंगभूमीवर आले आहे, दिग्दर्शक : अरविंद जोशी)


एक दिवा विझताना (कथासंग्रह)


एक होता मुलगा (बालनाटक)


ऐक टोले पडताहेत (गूढकथासंग्रह)


कबंध (कथासंग्रह)


कर्ता-करविता (नाटक)


कायमचे प्रश्न (वैचारिक)


खेकडा (कथासंग्रह)


खोल खोल पाणी (नाटक)


गहिरे पाणी (रंगमंचावर अनेकदा सादर झालेल्या कथांचा संग्रह. दूरचित्रवाणीवरही या कथा ५०हून अधिक भागांत क्रमशः प्रदर्शित झाल्या)


गाऊ गाणे गमतीचे (बालगीते)


गांधी : अंतिम पर्व (नाटक)


गोंदण (कथासंग्रह)


घर तिघांचं हवं


चटकदार – 5+1 (बालसाहित्य)


चि.सौ.कां.चंपा गोवेकर (नाटक)


चमत्कार झालाच पाहिजे ! (बालसाहित्य)


चार दिवस प्रेमाचे (ललित)


चूकभूल द्यावी घ्यावी (एकांकिका)


चोर आणि चांदणं (चतुर सारिकेचा वग, चोर आणि चांदण, प्रेमपुराण आणि बेडरूम बंद या चार विनोदी एकांकिकांचा संग्रह)


जस्ट अ पेग (एकांकिका)


जादू तेरी नझर (नाटक)


जावई माझा भला (नाटक)


जोडीदार


जौळ (कथासंग्रह)


ढगढगोजीचा पाणी प्रताप (बालसाहित्य)


तन-मन (नाटक)


तृप्त मैफल (कथासंग्रह)


दहाजणी


दादाची गर्ल फ्रेंड


2 बच्चे 2 लुच्चे (बालसाहित्य)


धडपडे बडबडे मारकुटे आणि मंडळी (बालसाहित्य)


निजधाम (कथासंग्रह)


निम्माशिम्मा राक्षस (बालसाहित्य)


निर्मनुष्य (कथासंग्रह)


निवडक मराठी एकांकिका


परदेशी (कथासंग्रह)


पानगळीचं झाड


पोर्ट्रेट आणि दोन एकांकिका


प्रियतमा (नाटक)


प्रेमपुराण (एकांकिका)


फॅंटॅस्टिक


सरदार फाकडोजी वाकडे (बालसाहित्य)


फाशी बखळ (कथासंग्रह)


बकासुर (नाटक)


बारा पस्तीस


बाळ, अंधार पडला


बृहन्महाराष्ट्र मंडळ शिकागो संमेलन 2011 – भाषण


बेडरूम बंद (एकांकिका)


ब्रह्महत्या


भूत-अद्‌भुत (बालसाहित्य)


मध्यरात्रीचे पडघम (कथासंग्रह)


महाराजांचा महामुकुट (बालनाट्य)


महाराष्ट्राचं चांगभलं (ललित)


माकडा माकडा हुप ! (बालसाहित्य)


मांजराला कधीच विसरू नका (नाटक, बालसाहित्य)


माझे रंगप्रयोग (704 पानी ग्रंथ – आत्मकथन, अनुभव कथन, आठवणी)


माणसाच्या गोष्टी भाग 1, 2.


मृत्युंजयी (गूढकथासंग्रह)


यक्षनंदन


रंगतदार 6+1 (आचार्य सर्वज्ञ, आरशाचा राक्षस, एक होता मुलगा, महाराजांचा महामुकुट, मांजराला कधीच विसरू नका !, राजकन्येचा कावळ्याचा फार्स, हुशार मुलांचे नाटक या 7 बाल-नाटिकांचा संग्रह)


रंगयात्री


रंगरूप-रंगभूमी चिकित्सा


रंगांधळा (कथासंग्रह)


रत्‍नपंचक


रत्नाकर मतकरी यांच्या गोंदण, शांततेचा आवाज आणि सोनेरी सावल्या या 3 ललित पुस्तकांचा संच


रत्‍नाकर मतकरी यांच्या श्रेष्ठ कथा : भाग 1, 2. (संपादक गणेश मतकरी)


रत्‍नाक्षरं – रत्‍नाकर मतकरी : व्यक्ती आणि साहित्य (ललित)


रसगंध (माहितीपर)


राजकन्येचा कावळ्याचा फार्स (बालनाटक)


राक्षसराज झिंदाबाद (बालसाहित्य)


शाबास लाकड्या (बालसाहित्य)


लोककथा – ’78


विठो रखुमाय (नाटक)


वेडी माणसं (एकांकिका)


व्यक्ती आणि वल्ली (नाटक) (सहलेखक – पु.ल. देशपांडे)


शनचरी (रत्नाकर मतकरी यांच्या निवडक गूढकथा, संपादक – डाॅ.कृष्णा नाईक)


शब्द ..शब्द ..शब्द


शांततेचा आवाज (ललित)


शूऽऽ कुठं बोलयचं नाही (नाटक, मूळ इंग्रजी नाटकावर आधारित))


संदेह (कथासंग्रह)


संभ्रमाच्या लाटा (कथासंग्रह)


सहज (कथासंग्रह)


साटंलोटं (नाटक)


सुखान्त (नाटक)


सोनेरी मनाची परी


सोनेरी सावल्या (ललित)


स्पर्श अमृताचा (नाटक)


स्वप्नातील चांदणे (परिकथासंग्रह)


हसता हसविता (ललित)


हुशार मुलांचे नाटक (बालनाटिका)


स्तंभ लेखन


’आपलं महानगर’ या वृत्तपत्रामधून “सोनेरी सावल्या” नावाचे स्तंभलेखन.


रत्नाकर मतकरी यांना मिळलेले पुरस्कार


1978 : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा ज्योत्स्ना भोळे पुरस्कार


1986 : उत्कृष्ठ पटकथेसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार (चित्रपट : माझं घर माझा संसार)


नाट्यदर्पणचा नाना ओक पुरस्कार


1985 : अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा देवल पुरस्कार


1985 : राज्य शासनाचा अत्रे पुरस्कार


1999 : नाट्यव्रती पुरस्कार


2003 : संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार


2016 : ‘माझे रंगप्रयोग’ या ग्रंथासाठी इंदिरा-भालचंद्र पुरस्कार


2016 : शांता शेळके पुरस्कार


2018 : साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार


1983: भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची शिष्यवृत्ती