मुंबई : संपूर्ण देश सध्या एका मोठ्या संकटाला सामोरं जात आहे. ज्या कोरोना व्हायरसने जवळपास संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. त्याला हरविण्यासाठी आता अनेक प्रयत्न केले जात आहे. भारतात देखील सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशावेळी काही कठोर निर्णय सरकारने घेतले. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जनता कर्फ्यू. खुद्द पंतप्रधान मोदींनी सांगितल्याप्रमाणे आज देशभरात कर्फ्यू पाळला जात आहे. पण त्याचवेळी डॉक्टर, वैद्यकीय सेवेचे आभार मानण्यासाठी सायंकाळी पाच वाजता पाच मिनिटं थाळीनाद, टाळ्या वाजवण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं. पण याच पाच मिनिटात अनेकांनी एक मोठी चूक केली.
आपल्या टेरेसवर, बाल्कनीमध्ये किंवा खिडकीजवळ येऊन २४ तास आपल्यासाठी परिश्रम घेणाऱ्यांचे टाळ्या वाजवून किंवा थाळीनाद करुन आभार मानावेत असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं. त्यामुळे आज संपूर्ण देशभरात पाच वाजता अनेकांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला साथ देत थाळीनाद केला. पण याच वेळी बऱ्याच ठिकाणी एक मोठी चूक झालेली दिसून आली.
कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी एकत्र न येणं, गर्दी न करणं. हाच सध्या तरी जालीम उपाय आहे. मात्र, आज दिवसभर घरात बसणाऱ्या अनेकांनी त्या पाच मिनिटात आपल्या इमारतीच्या गच्चीवर किंवा खालील परिसरात एकत्र येऊन थाळीनाद करण्याचा एक सामूहिक कार्यक्रम आटोपला. त्यामुळे एकत्र न येण्याचा, गर्दी न करण्याची चूक अनेकांनी पुन्हा केल्याचं दिसून आलं. अनेक इमारतींच्या गच्चीवर लोक घोळक्याने थाळीनाद करत असल्याचं दिसून आलं. जर यापैकी एखादी व्यक्ती देखील कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत.
https://youtu.be/mRiQY1StZuI