एकही गिरणी कामगार बेघर राहणार नसल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही


   
गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या 3 हजार 894 सदनिकांची सोडत


मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगारांचे मोठे योगदान आहे. या प्रत्येक गिरणी कामगारास घर देण्यासाठी शासन कटिबद्ध असून एकही गिरणी कामगार बेघर राहणार नाही,  अशी ग्वाही  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांना दिली. गिरणी कामगारांनी त्यांना मिळालेली घरे इतरांना विकू नयेत आणि मुंबई बाहेर जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.


म्हाडाच्या विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार व त्याच्या वारसांसाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागातील बॉम्बे डाईंग, स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागेवर उभारण्यात आलेल्या
3 हजार 894 सदनिकांची सोडत आज वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड, महापौर किशोरी पेडणेकर, सभापती विनोद घोसाळकर, झोपडपट्टी पुनर्वसनचे सभापती विजय नाहटा, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, नवाकाळच्या संपादिका जयश्री खाडिलकर उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, मी आज भाषण न करता कुटुंबातील प्रमुख म्हणून तुमच्याशी संवाद साधणार आहे. गिरणी कामगारांचे  ऋण माझ्यावर आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी आलो आहे. घर मिळाल्यावर मला आपल्या घरी चहा प्यायला बोलवा, आपल्या घरात आनंदी राहा, घरे विकू नका मुंबईचा हक्क गमावू नका, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


जास्तीत जास्त परवडणारी घरे देणार- डॉ. आव्हाड


यावेळी बोलताना गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड म्हणाले, मुंबई पालिका क्षेत्रातील बंद पडलेल्या गिरण्यामधील गिरणी कामगारांना घरे देण्याचा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. येत्या काळात जास्तीत जास्त परवडणारी घरे मुंबईत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. कोणीही घरापासून वंचित राहणार नाही. झोपडपट्टीवासीय, गिरणी कामगार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. पुढील काळात पोलीस, शासकीय चतुर्थ कर्मचारी यांच्यासाठी प्रत्येकी 10 टक्के घरांचा समावेश असेल, असेही श्री. आव्हाड म्हणाले. आता दुःखाचे दिवस संपले असून सुखाचे दिवस आले आहेत, शेवटच्या गिरणी कामगारांना न्याय मिळवून दिला जाईल, असे महापौर श्रीमती पेडणेकर यांना यावेळी बोलतांना सांगितले.


मुंबई मंडळातर्फे वडाळा येथील बॉम्बे डाईंग मिल गृहप्रकल्पांतर्गत 720 सदनिका, स्प्रिंग मिल येथे 2630 सदनिका आणि लोअर परेल येथील श्रीनिवास मिलच्या जागी 544 सदनिका आहेत. या सदनिका मुंबईतील सर्वात उच्चभ्रू ठिकाणी  असून 225 चौ. फुटाच्या वन बीएचके स्वरुपातील सदनिका अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त आहेत. तसेच आधुनिक काळाची गरज लक्षात घेता वडाळा येथील बॉम्बे डाईंग मिल गृह प्रकल्पाच्या आवारात 15 मजल्याचे वाहनतळ इमारत (पार्किंग टॅावर) उभारण्यात आले आहे. याकरिता एकूण 1 लाख 74 हजार 36 अर्ज गिरणी कामगार व त्याच्या वारसांकडून प्राप्त झाले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.