गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या एका सराईताला एलसीबीकडून अटक


पुणे – गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत सशस्त्र गुन्हेगाराला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तुल, तलवार, कोयता अशी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.


फैजान उर्फ बबलू शकील अन्सारी (वय २२, रा. घोरपडे वस्ती, लोणीकाळभोर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.


वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी गस्त घालत असताना एलसीबीच्या पोलिसांना एक तरुण गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी फैजान याला ताब्यात घेतले.


फैजानची झडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल, तलवार आणि कोयता अशी घातक शस्त्रे मिळून आली. 


पोलिसांनी एकूण ५१ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.


त्यांच्यावर सन २०१७ मध्ये खुनाच्या प्रयत्नाचा एक आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोन असे तीन गुन्हे दाखल आहेत.आरोपीला पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस कर्मचारी रौफ इनामदार, मुकुंद आयचीत, विजय कांचन, धीरज जाधव, अक्षय जावळे यांच्या पथकाने केली आहे.