आता 'ड्राईव्ह थ्रू' करा कोरोनाची चाचणी सुरू 24 तासात मिळणार रिपोर्टः ऑनलाईन नोंदणीची सुविधा इन्फेक्शन लॅबच्या माध्यमातून सुविधा


ठाणे : ठाणे शहरातील कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध प्रयत्न करण्यात येत असून आता ठाणेकर नागरिकांना सहजपणे कोरोनाची चाचणी करता यावी यासाठी राज्याचे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उफक्रम) तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या पुढाकाराने महापालिका, इन्फेक्शन लॅब या आयसीएमआर प्राधिकृत लॅबच्या माध्यमातून ठाण्यात ड्राईव्ह थ्रू, च्या माध्यमातून नागरिकांसाठी टेस्टींग सुविधा सुरू करण्यात आली आहे.     


कॅडबरी जंक्शन आणि कळवा नाका येथे इन्फेक्शन लॅबच्या माध्यमातून ड्राईव्ह थ्रू पद्धतीने स्वॅब टेस्टींगची सुविधा निर्माण करण्यात येणार असून या सुविधेमुळे नागरिकांना स्वॅब तपासणीसाठी आता कुठल्याही लॅबमध्ये जाण्याची गरज नसून ॲानलाईन नोंदणी केल्यानंतर दिलेल्या वेळेत जाऊन कोरोनाची चाचणी करता येणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे चाचणी केल्यानंतर 24 तासांत त्या चाचणीचा अहवाल संबंधित व्यक्तींस ॲानलाईन पद्धतीनेच प्राप्त होणार आहे.


या तपासणी केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर व प्रयोगशाळा तंत्रज्ञ व प्रशिक्षीत कर्मचारी वर्ग नेमण्यात आला असून सकाळी 10 ते 6 या वेळेत ही चाचणी करण्यात येते. दरम्यान तपासणीसाठी येताना ऑनलाईन नोदणीची आणि पैसे भरल्याची पावती घेवून स्वत:च्या बंदिस्त चारचाकी वाहनातूनच त्यांना बूथवर येणे अनिवार्य असणार आहे. सदर व्यक्तीचे त्याचे वाहनातच स्वॅब घेण्यात येतात. तपासणीनंतर त्याचा अहवाल त्या व्यक्तीस तसेच ठाणे महापालिकेस ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. या उपक्रमास ओबेराय रियॅलीटी यांनी सहकार्य केले असून इन्फेक्शन लॅबचे डॉ. सचिन भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा कार्यान्वीत करण्यात आली आहे.


इन्फेक्शन लॅबच्या माध्यमातून कोरोना चाचणी करावयाची आहे त्यांना या http://infexn.in/COVID-19.html या लिंकवर तपासणीसाठी ॲानलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल. सदर नोंदणीची आणि पैसे भरल्याची पावती तसेच महापालिकेच्या ताप बाह्यरूग्ण तपासणी केंद्र किंवा खासगी ताप बाह्यरूग्ण तपासणी केंद्रांकडून सदर रूग्णाची कोव्हीड चाचणी आवश्यक असल्याबाबतचे शिफारस पत्र, आयसीएमआरच्या मार्गदर्शक सुचनांनुसार फॅार्म 44 मधील सर्व माहिती भरून संबंधित डॅाक्टरचे पत्र तपासणी केंद्रांवर दाखविल्यावर नागरिकांना त्यांच्या वाहनात बसूनच त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या चाचणीचा अहवाल 24 तासांत संबंधित व्यक्तींस आणि महापालिकेसही प्राप्त होणार आहे.



 ड्राईव्ह थ्रू चाचणीसाठी रूग्णास स्वतःच्या बंदिस्त वाहनामधून येणे बंधनकारक आहे. किंवा महापालिकेच्या फिव्हर ओपीडीमधून संबंधित वैद्यकिय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून कोव्हीडसाठी नियुक्त करण्यात आलेल्या ॲम्बुलन्सने तेथे जाता येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत दुचाकीस्वारास किंवा बंदिस्त वाहनांमधून न येणाऱ्या रूग्णांस चाचणीसाठी प्रवेश दिला जाणार नाही.