भाजपा नगरसेवक अजय बहिरा यांना वाढदिवसाची पार्टी भोवली


नवी मुंबई - करोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाउन व संचारबंदीची घोषणा केलेली असतान मित्रांना घरी बोलावून वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पनवेल पालिकेच्या नगरसेवक व इतर दहा जणांवर पनवेल शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला.


पनवेल पालिकेच्या प्रभाग क्रमांक २० - क मधून निवडून आलेले अजय तुकाराम बहिरा यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एका जागरुक नागरिकाने याबाबत माहिती दिल्यावर शुक्रवारी रात्री १२ वाजता पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे यांच्यासह पथक नगरसेवक बहिरा यांच्या घरी दाखल झाले असता, त्यांना वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले दहा मित्र व नगरसेवक बहिरा आढळून आले. तेथील दारुची बाटलीही पोलीसांनी जप्त केली.


याप्रकरणी तातडीने नगरसेवक बहिरा व अन्य दहा जणांविरोधात संसर्ग साथ नियंत्रणात निष्काळजी वर्तन केले म्हणून आणि संचारबंदीत चारपेक्षा अधिक जण जमवले म्हणून गुन्हे नोंदविले आहेत. नगरसेवकाने केलेल्या वाढदिवसाच्या पार्टीमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.