'Life Saver Medicines' चा बोर्ड लावलेल्या ट्रकमध्ये मिळाला ३६ लाखांचा गुटखा, दोघांना अटक


मावळ – लाॅकडाऊनमध्ये ‘अत्यावश्यक सेवा – लाईफ सेव्हर मेडिसीन’ असा बनावट पास कंटेनरच्या काचेवर लावून त्यातून चक्क गुटख्याची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण दलातील गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून ३६ लाख रूपये किंमतीचा गुटखा व १५ लाखांचा कंटेनर असा एकूण ५१ लाखांचा ऐवज जप्त केला. वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. 


या प्रकरणी कंटेनर ड्रायव्हर नारायणसिंग धनसिंग चौहान (वय ३९ रा. बांगडी ता.रायपूर पाली, राजस्थान) व क्लिनर महेंद्रसिंग लक्ष्मणसिंग चौहान (वय 28 रा.राजस्थान) यांना पोलिसांनी अटक केली आहे.


गुन्हे अन्वेषण शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाॅकडाऊन असल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक एक पथक तयार करण्यात आले आहे.कोरोनामुळे संपूर्ण देशात लाॅकडाऊन पुकारलेला आहे.त्यात जीवानावश्यक माल व वस्तूंची वाहतूक विक्री वगळून सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. असे असताना कंटेनर क्रमांक एच आर ३८ झेड ९४६१ या कंटेनरच्या पुढच्या काचेवर बनावट अत्यावश्यक सेवेचा पास लावला होता.


सदर कंटेनर लोणावळ्याहून द्रुतगती महामार्गावर जाणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती.त्यानुसार हे पथक कंटेनरची माहिती घेत उर्से टोलनाक्यावर आले. सदर कंटेनर सोमाटणेमार्गे पुन्हा जुन्या हायवेने लोणावळ्याकडे निघाल्याचे समजले. वडगाव फाट्यावर या पथकाने सापळा लावला. त्या ठिकाणी तो कंटेनर आला.


त्याच्याकडे चौकशी केली असता कंटेनरमध्ये तांदळाची पोती असल्याचे सांगण्यात आले.प्रत्यक्षात तपासणी केली असता, राजनिवास नावाची गुटख्याची एकूण ३० हजार पाकिटे आढळून आली. त्याची किंमत ३६ लाख रुपये व कंटेनर १५ लाख रुपये असा एकूण ५१ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.


पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय जगताप, प्रकाश वाघमारे, राजू पुणेकर, अक्षय नवले यांनी ही कारवाई केली.


घटनास्थळी अन्न व औषध प्रशासनाने पाहणी करून पंचनामा केला. वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.