गावी परतणा-या परप्रांतीयांच्या आरोग्य तपासणीसाठी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात लागल्या लांबच लांब रांगा.. मात्र  सोशिअल डिस्टंन्सचा उडतोय फज्जा


मुरबाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने  घेतलेल्या निर्णयामुळे परप्रांतीयांचा परतीचा प्रवासाचा मार्ग मोकळा झाला असल्यामुळे  परप्रांतीयांच्या आरोग्य तपासणी सर्टिफिकेट साठी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे सामाजिक अंतर म्हणजेच सोशिअल डिस्टंन्स पाळले जात नसल्याचे दिसून आले.


मुंबई -महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर पसरलेल्या कोरोनाच्या संकटात अडकलेल्या परप्रांतीयांना उद्योग, धंदे,बंद असल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट झाला असुन,त्यामुळे मुंबई महाराष्ट्रात राहणे अवघड झाले आहे.अशावेळी , "गड्या आपलं गावच बरं " अस म्हणत आपल्या गावी जाण्यासाठी अकांडतांडव सुरु केले होते.त्या पार्श्वभूमीवर केंद्र  सरकार व  महाराष्ट्र सरकारने सकारात्मक निर्णय घेवून परप्रांतातुन आलेल्या लोकांना त्यांच्या मुळगावी परत जाण्यासाठी रितसर परवानगी, आणि प्रवासासाठी ट्रेन उपलब्ध केल्या आहेत. मात्र त्यासाठी प्रत्येकाने आपली आरोग्य तपासणी, व कागदपत्रे तयार करून सरकारने घालून दिलेल्या अटी ,शर्ती,आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रवास करावयाचे आहे.असे निर्देश जारी केले आहेत.त्या अनुषंगाने गेले तिनचार दिवस मुरबाड ग्रामीण रुग्णालयात आपली आरोग्य तपासणी करून दाखले मिळवण्यासाठी परप्रांतियानी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.गेल्या  तिन दिवसांत सुमारे तिन ते चार हजार परप्रांतीय मजुराने हे दाखले प्राप्त केले आहेत.त्यासाठी डॉ क्टर,आरोग्य कर्मचारी आणि कायदा सुव्यवस्था राखणे कामी पोलिसांनी महत्वाची भुमिका बजावली. परंतु आपापल्या घरी जाण्याची अतिघाई झाल्याने परप्रांतियांकडून  यावेळी  कुठल्याही प्रकारे सामाजिक अंतर राखले जात नसल्याची बाब निदर्शनास आली.