निराधार मुलींना विवाहासाठी मदत

निराधार मुंबई : पनवेल व नाशिक महापालिकेच्या धर्तीवर मुंबईतील विधवा, निराधार, घटस्फोटित व परित्यक्त्या महिलांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांच्या मुलींच्या विवाहासाठी मुंबई महापालिकेने किमान एक लाख रुपये आर्थिक मदत करावी, अशी मागणी भाजपने पालिकेकडे केली आहे. एखाद्या कुटुंबातील अर्थार्जन करणाऱ्या प्रमुख व्यक्तीचे निधन झाल्यामुळे त्याची पत्नी निराधार होते. तसेच परित्यक्त्या, घटस्फोटित महिलांच्या घरात कमावती व्यक्ती नसल्यामुळे मुलांचे संगोपन, शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा कुटुंबातील मुली या अविवाहित राहतात. मुलींच्या विवाहासाठी प्रसंगी निराधार महिलांना व्याजाने कर्ज काढावे लागते. राहते घरही विकावे लागते. त्यामुळे त्या महिला व त्यांची मुले ही बेघर होतात. अशा मुलींना आर्थिक मदतीची गरज आहे, असे भाजपचे नगरसेवक आकाश पुरोहित यांनी म्हटले आहे.


पनवेल व नाशिक पालिकेतर्फे अशा निराधार महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात येते. गोवा, केरळ यांसारख्या लहान राज्यांच्या तुलनेत मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प मोठा आहे. त्यामुळे पालिकेने या निराधार महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदतीची जबाबदारी स्वीकारावी, असे पुरोहित यांनी पालिकेत केलेल्या ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे. हा ठराव मंजूर झाल्यास व त्यास पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, तर त्यावर अंमलबजावणी होऊ शकते.