मुलीने प्रेमविवाह केल्याने आई-वडिलांनी पोलीस ठाण्याच्या समोर केले विषप्राशन


नगर : मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग आल्याने मुलीच्या आई व वडिलांनी पोलीस स्टेशनच्या गेटजवळच विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल राहुरी पोलीस ठाण्यात घडली आहे. दोघांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील एका तरुणीचे तिच्या गावातच राहाणाऱ्या तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते ; मात्र घरच्या लोकांचा प्रेमविवाहाला विरोध होता . त्यामुळे दोघांनी काही दिवसांपूर्वी घरातून पलायन केले व आळंदी येथे विवाह केला. 


दरम्यान मुलीच्या घरच्यांनी मुलगी हरविल्याची फिर्याद राहुरी पोलिसांत दिली होती. तपास सुरू असतानाच दि . ६ मार्च रोजी तरूण व तरूणीने लग्न केल्याचे प्रमाणपत्र राहुरी पोलीस ठाण्यात सादर केले .


पोलिसांनी मुलीच्या घरच्यांना माहिती देऊन पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. मुलीचे वडील व भाऊ पोलीस ठाण्यात आले. मुलीने लग्न केल्याचे समजताच त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच मुलीस मारहाण केली.


दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुलगी व मुलगा पोलीस ठाण्यात असताना मुलीचे आई - वडील विषारी औषधाची बाटली घेऊन आले आणि पोलीस ठाण्याच्या गेटजवळच त्या दोघांनी औषध प्राशन केले.