कोरोना'च्या भितीने आठवडा बाजार थंडावला


वाडा  : (प्रतिनिधी) तालुक्यातील कुडूस येथे दर शुक्रवारी आठवडा बाजार भरतो.या बाजारात हजारो ग्राहक वस्तू खरेदी साठी येत असतात मात्र सध्या कोरोना विषाणूची भिती वाटत असल्याने आजच्या बाजारात खरेदी साठी ग्राहकांनी पाठ फिरवल्याने बाजार थंडावल्याचे दिसून आले.त्यामुळे ग्राहकांची बाजारात तुरलक गर्दी दिसून येत होती. 



औद्योगिककरणाचे मुख्य केंद्र असलेल्या कुडूस येथे दर शुक्रवारी आठवडा बाजार भरतो. ब्रिटीशकाळापासून हा बाजार भरत असल्याने त्याला आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. आज दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणात असली तरी बाजाराचे महत्त्व कमी झालेले नाही. कुडूस ही 52 गावांची बाजारपेठ असून लोकसंख्या सुमारे 50 ते 75 हजारांच्या आसपास आहे. तसेच या परिसरात शेकडो कारखाने असल्याने हजारो कामगार येथे वास्तव्यास आले आहेत .यामध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे स्थानिक व परप्रांतीय नागरिक बाजारात येत असल्याने येथे मोठी गर्दी होत असते.हा बाजार सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत चालतो. या बाजारात घोटी,इगतपुरी, नाशिक वसई अर्नाळा पालघर येथील व्यापारी आपला माल घेऊन येत असतात. येथील नागरिक आठवड्याचे सामान खरेदी करण्यासाठी बाजारात येत असतात. 



मात्र सध्या कोरोना या व्हायरल आजाराची नागरिकांना भिती वाटत असल्याने तसेच प्रशासनाकडूनही गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असे आवाहन करण्यात आल्याने नागरिकांनी भीतीपोटी गर्दीच्या ठिकाणी जाणे बंद केल्याने आज कुडूस येथील आठवडा बाजार थंडावल्याचे दिसून आले. नागरिकांची तुरलक गर्दी यावेळी दिसून येत होती. कुडूसच्या बाजारात चालायलाही जागा नसायची एवढी प्रचंड गर्दी या बाजारात होत असते मात्र कोरोना मुळे नागरिकांनी बाजारात न जाणेच पसंत केल्याचे दिसून येत होते.