‘डेक्कन क्विन’ला आता जर्मन तंत्रज्ञानाची जोड


नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या वारसा यादीत अग्रणी असणाऱ्या 90 वर्ष जुन्या पुणे-मुंबई शहरांदरम्यान धावणाऱ्या ‘डेक्कन क्विन’ रेल्वेगाडीचे रूप आता बदलणार आहे. या गाडीला जर्मन तंत्रज्ञानाधारीत डब‌्बे आणि विशेष सुरक्षा व्यवस्था तर राष्ट्रीय प्रारूप संस्थेच्या माध्यमातून (एनआयडी)आकर्षक बाह्यरूप, विशेष लोगो अशा सुधारणा करण्यात येणार आहेत.


‘डेक्कन क्विन’ या रेल्वे गाडीची सेवा अधिक प्रवासी स्नेही करण्याच्या दृष्टीने मध्यरेल्वेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार रेल्वेगाडीच्या रुपासह, सुरक्षेवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.



‘डेक्कन क्विन’ मध्ये असे होणार बदल   


या रेल्वे गाडीच्या ताफ्यात आता जर्मन डिझाईनचे लिंक हॉफमन बुश (एल.एच.बी.) हे विशेष डब्बे येणार आहेत. हे डब्बे सुरक्षेच्या आणि आरामदायी प्रवासाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. यासोबतच एल.एच.बी डब्यांचे बाह्यरूपही आकर्षक बनविण्यात येणार आहे. त्यामुळे सद्याच्या निळ्या- पांढऱ्या व लाल रंगातील ही रेल्वे गाडी अधिक आकर्षक रूपात प्रवाशांच्या दिमतीस येणार आहे. प्रवशांना या रेल्वेगाडी विषयी असणारा जिव्हाळा लक्षात घेता बाह्यरूपाचे प्रारूप तयार करताना विविध माध्यमांतून प्रवशांची मतं व सूचना घेण्यात आल्या आहेत. यासर्वांच्या आधारे आणि प्रवाशांच्या पसंतीक्रमाधारे मध्यरेल्वेने तयार केलेल्या एकूण प्रारूपापैकी योग्य त्या प्रारूपाची निवड करण्यात येईल.   



वेगळी ओळख सांगणाऱ्या डेक्कन क्विनसाठी विशेष लोगोही तयार करण्यात येणार आहे. जागतिक वारसा लाभलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या धर्तीवर हा लोगो तयार करण्यात येत असून मध्यरेल्वेने तयार केलेल्या 8 वेग-वेगळ्या रेल्वे डब्यांच्या बाह्यस्वरूपाचे प्रारूप आणि लोगो रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार अहमदाबाद येथील राष्ट्रीय प्रारूप (डिझाइन) संस्थेकडे पाठविण्यात आले आहे. या संस्थेच्या पथकाने डेक्क्न क्विनला भेट दिली व प्रवाशांच्या भावनाही जाणून घेतल्या. एनआयडीचे हे पथक या महिन्यातच आपला अहवाल सोपवणार आहे.


वर्ष 1930 पासून प्रवाशांच्या सेवेत रूजू झालेल्या डेक्कन क्विनच्या नावे महत्त्वपूर्ण विक्रम आहेत. यात देशातील पहिली सुपर फास्ट ट्रेन होण्याचा बहुमान, पहिली लांब पल्ल्याची ईलेक्ट्रीक ट्रेन, महिलासांठी स्वतंत्र डबा असणारी देशातील पहिली ट्रेन आणि डायनींग कार प्रमाणे आसनव्यवस्था असणारी देशातील पहिली ट्रेन होण्याचा बहुमानही या रेल्वे गाडीने मिळविला आहे.