फिर्याद दिली म्हणून पती-पत्नीला विवस्त्र करून पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न


नगर - अत्याचार प्रकरणातील फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह पतीलाही विवस्त्र करून पेट्रोल टाकून मारहाण करण्यात आल्याची घटना नगरमध्ये उघडकीस आली आहे. या मारहाणीत पोलिसांचाही समावेश असल्याचा पीडित पती-पत्नीचा आरोप आहे.


तक्रार दिली तर व्हिडीओ व्हायरल करू आणि नवर्‍यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी आरोपींकडून देण्यात आली असल्याचा दावाही पीडित कुटुंबाने केला आहे. यापूर्वीही महिलेला पोत्यात घालून रेल्वेखाली मारण्याचा प्रयत्न झाला होता.


नगरमध्ये २०१६ मध्ये एका विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाला होता. त्याची फिर्याद दिल्यानंतर तोफखाना पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता. आरोपींमध्ये वडील आणि भावासह पोलीसही सहभागी आहेत.


अत्याचाराची फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित कुटुंबावर दबाव टाकण्यात येत आहे. मेडिकल रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही आरोपींना जामीन नाकारले आहेत. चार वर्षे उलटूनही गंभीर गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल झालेले नाही.


दरम्यान ''घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पिडीत पती-पत्नी यापूर्वी माझ्याकडे आले असते. तर, यापूर्वीच त्यांना न्याय दिला असता. मी या घटनेसंदर्भात माहिती घेतली आहे. याबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहे.'' अशी प्रतिक्रीया खा.डॉ.सुजय विखे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली.


या घटनेसंदर्भात सखोल चौकशी करून पीडितेला न्याय देणार आहे. या घटनेमध्ये पोलिसांचा सहभाग असेल तर त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल. पीडित पती-पत्नीच्या सुरक्षेची पोलिसांकडून पूर्ण काळजी घेतली जाईल, अशी प्रतिक्रीया प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ.सागर पाटील यांनी दिली.


 


१.चार वर्षे झालीत तरीसुद्धा पोलिसांनी दोषारोप न्यायालयात का सादर केलेले नाहीत ?
२.एवढं कौर्य घडून देखील पोलिसांनी आरोपींना बेड्या का ठोकल्या नाहीत ?
३.पोलिसांचे कोणत्या प्रकारचे लागेबांधे आरोपींशी आहेत का ?
४.सामान्य माणसाने केलेला व्यवहार हा अपहार, मात्र पोलिसांनी कितीही पैसे खाल्लेत तरी त्याचा पुरावा नसल्याने तो अपहार होत नाही का ?


असे अनेक प्रश्न या दुर्दैवी घटनेने तोफखाना नगर पोलिसांच्या विरोधात  पुढे येत आहेत.