ठाणे : प्रत्येक स्त्रीमध्ये हे कलागुण असतातच, परंतु या कलागुणांना वाव देता यावा किंबहुना त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी जागतिक महिलादिनी महापौर नरेश म्हस्के आणि स्वत्व संस्थेतर्फे लेखन, चित्रकला आणि छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार दिनांक 8 मार्च रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक, तीन हात नाका, ठाणे येथे होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापौरांनी केले आहे.
चित्रकला स्पर्धा तीन गटात होणार असून व्यावसायिक गट वयोमर्यादा 21 वर्षावरील, हौशी गट क्र. 1 वय वर्षे 15 ते 25, गट क्र. 2 वय वर्षे 25 वर्षावरील अशी असणार आहे. स्पर्धेसाठी 'एकविसाव्या शतकातील महिला' हा विषय असून चित्र काढण्याकरिता 3 तासाचा कालावधी असणार आहे. स्पर्धेची वेळ सायंकाळी 4 ते 7 अशी असणार आहे. कोणत्याही माध्यमाचा वापर करून चित्र काढता येईल.चित्राचा आकार A3 (11x16 किंवा 12x18) असावा. कागद, कॅनव्हास, रंग साहित्य, ब्रश, पॅलेट इत्यादी सर्व स्पर्धकांनी सोबत आणावयाचे आहे. प्रत्येक गटात 1ले, 2रे, 3रे आणि 2 उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील.
छायाचित्रण स्पर्धेसाठी 3 तास वेळ असून 'स्मारक व परिसरातील छायाचित्रे' हा विषय ठेवण्यात आला आहे. स्पर्धेक स्वत:च्या कोणत्याही कॅमेऱ्याचा वापर करु शकतात. प्रत्येक महिला छायाचित्रकार जास्तीत जास्त चार छायाचित्र स्पर्धेसाठी देऊ शकतात. छायाचित्राच्या सॉफ्ट कॉपीज् सायंकाळी 4.30 ते 7.00 वाजेपर्यत स्वीकारण्यात येतील.विजेत्यांसाठी 1ले, 2 रे, 3 रे आणि 2 उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. दोन्ही स्पर्धांसाठी स्पर्धेच्या ठिकाणी अर्धातास आधी किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
लेखन स्पर्धेसाठी वयोगट 18 वर्षावरील असून स्पर्धेकांना विषय स्पर्धेच्या वेळी देण्यात येईल.दिलेल्या विषयावर किमान 300 ते कमाल 500 शब्दात निबंध लिहायचा आहे. स्पर्धकांनी सोबत फुलस्केप आकाराचे कागद, पॅड आणि पेन आणणे आवश्यक असून सायं. 4 ते 7 या वेळेत ही स्पर्धा होणार आहे.
तिन्ही स्पर्धांचा निकाल त्याचठिकाणी जाहीर होणार असून सायं. 6 वाजता पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. सर्व स्पर्धांसाठी परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे. स्पर्धक आपली नावे खालील google form link var clickकरून नोंदवू शकतात.
स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेशशुल्क नसून एका व्यक्तीला कोणत्याही एकाच स्पर्धेत भाग घेता येईल. तरी या सर्व स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व स्वत्व संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
पुरूषांनी केले आयोजन
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देता यावा यासाठी स्वत्व संस्थेच्या सर्व पुरूषांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.