पोलादपूर प्रतिनिधी : पोलादपूर एसटी स्थानकाबाहेर चौपदरीकरणाच्या कामादरम्यान तयार झालेल्या एसटी स्थानकातील सांडपाण्याच्या नाल्यामुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या दूर्गंधीबाबत पोलादपूर नगरपंचायतीने पाठपुरावा केला आणि आ.भरत गोगावले यांनी याबाबत संबंधितांना सुचना दिल्या. यामुळेच, शुक्रवारपासून सांडपाण्याचा उपसा सुरू झाला असताना काही राजकीय पक्षांनी पत्रकबाजी व बॅनरबाजी सुरू करून या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. या सांडपाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी राज्यातील आघाडीसरकारच्या माध्यमातून एस.टी.स्थानकामध्येच व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आ.गोगावले यांनी यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीस भ्रमणध्वनीवरून बोलताना दिली.
पोलादपूर शहरातील एस.टी.बसस्थानकाबाहेरील चौपदरीकरणाच्या कामामध्ये विद्यामंदिर पोलादपूरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बसस्थानकातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी पोलादपूर नगरपंचायतीच्या पाठपुराव्यानुसार एलऍण्डटी ठेकेदार कंपनीचे अभियंता नायडू आणि अन्य यांना आ.गोगावले यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. यानंतर सदर नाल्याचा उपसा करण्यासाठी एक आठवडयाची मुदत एलऍण्डटी ठेकेदार कंपनीने मागितली होती.
यादरम्यान, एका किंचितशा राजकीय पक्षांनी पत्रकबाजी आणि बॅनरबाजी करून या कामाकडे दूर्लक्ष होत असल्याचा गाजावाजा केला. जे काम नगरपंचायतीच्या पाठपुराव्यानेच होणार होते ते सुरू झाल्यानंतर या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न या किंचितशा राजकीय पक्षाने केल्याने पोलादपूरकरांमध्ये गैरसमज पसरविण्यात यश मिळविले. मात्र, हे काम नगरपंचायतीच्याच पाठपुराव्याने आणि आ.गोगावले यांच्या सुचनेनुसार होत असल्याची माहिती यावेळी नगराध्यक्ष नागेश पवार यांनी दिली.
याप्रसंगी आ.गोगावले यांनी प्रस्तुत प्रतिनिधींना मोबाईलद्वारे पोलादपूर बसस्थानकातील सांडपाण्याचा निचरा करण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने खा.सुनील तटकरे, पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांच्यासोबत आपण चर्चा करून आघाडीसरकारच्या माध्यमातून एस.टी.स्थानक परिसरातच सांडपाणी संकलनाची कायमस्वरूपी टाकी बांधण्याचा प्रयत्न करीत असून यासंदर्भात महाड एस.टी.आगाराच्या वाहतुक नियंत्रक व विभागीय वाहतूक नियंत्रकांसोबत चर्चा केली असल्याची माहिती दिली.
आ.गोगावले आणि नगराध्यक्ष नागेश पवार यांनी स्पष्टीकरण केल्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये एस.टी.स्थानकाबाहेरील सांडपाण्याच्या नाल्याबाबत कोणाचे प्रयत्न यशस्वी झाले याबाबत स्पष्ट खुलासा झाल्याने पोलादपूरकरांनी गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन यावेळी नगराध्यक्ष नागेश पवार यांनी केले आहे.
बोरावळे ग्रुपग्रामपंचायतीमध्ये 14 व्या वित्त आयोगामार्फत आरोग्य शिबीर यशस्वी
पोलादपूर (शैलेश पालकर)-तालुक्यातील बोरावळे ग्रूप ग्रामपंचायतीमध्ये केंद्रसरकारच्या माध्यमातून मिळणाऱ्या 14 वित्त आयोगाच्या माध्यमातून आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
यावेळी पोलादपूर तालूका वैद्यकीय आधिकरी डॉ.सोनवणे, डॉ. सलागरे,डॉ. श्रीमती बोऱ्हाडे, लॅब टेक्निशियन जाधव, परिचारिका शिकलगार, महालॅबचे टेक्निशियन निलेश पवार, लेप्रसीच्या गीतांजली पवार आणि चव्हाण हे उपस्थित होते.
सरपंच वैभव चांदे यांनी सर्व डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. यानंतर पेशंट तपासणी काम तपासणीचे काम सुरू झाले. पोलादपूर पंचायत समितीच्या सभापती श्रीमती नंदा चांदे यांनी आरोग्य शिबिराला भेट देऊन सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्वागत केले.सभापती नंदा चांदे यांनी स्वत: या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी करून घेतली. याप्रसंगी सरपंच वैभव चांदे, उपसरपंच सचिन जाधव, माजी सरपंच निवृत्ती उतेकर, तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग जाधव, ग्रामपंचायत सदस्य शिंदे, ग्रामपंचायत सदस्या वारे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश जंगम यांनीही या शिबिरामध्ये शरीराची आरोग्य तपासणी करून घेतली यावेळी रानवडी, बोरावळे, घागरकाेंड येथील ग्रामस्थांनी आरोग्य शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमाला बोरावळे येथील आशासेविका श्रीमती मोरे तसेच रानवडीतील स्वयंसेविका जाधव यांनी यावेळी बहुमोल सहकार्य केले तर ग्रुपग्रामपंचायत बोरावळे तसेच ग्रामसेवक श्रीकांत डोरकर यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
पोलादपूर तालुक्यातील बोरावळे ग्रुपग्रामपंचायतीमध्ये 14 व्या वित्त आयोगांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरावेळी सभापती श्रीमती नंदा चांदे, सरपंच वैभव चांदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनावणे, डॉ.सलागरे, डॉ.श्रीमती बोऱ्हाडे व अन्य. (छाया-शैलेश पालकर)