जागतिक महिला दिनी ठाण्यात समता मेळावा: रंगारंग कार्यक्रमातून होणार स्त्री जागर!


जागतिक महिला दिनी, महिला दिन आणि क्रांतीजोती सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त ठाण्यातील विविध लोकवस्त्यांमधील
स्त्री - पुरुषांचा "समता मेळावा" रविवारी, ८ मार्च रोजी समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. एकट्याच्या हिकमतीवर, घर - संसार सांभाळणा-या "एकल मातां"चा या वेळी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के व उप महापौर पल्लवी कदम यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा मनिषा जोशी असणार आहेत.
      
रविवार, ८ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता कॉ. गोदूताई परुळेकर उद्यानातील खुल्या रंगमंचावर होणा-या या समता मेळाव्यात विविध सांस्कृतिक व जागर कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
संविधान अभ्यासक व लेखक सुरेश सावंत यांची 'नागरिकता हक्क आणि संविधान', यावर एकलव्य कार्यकर्ता अजय भोसले मुलाखत घेणार आहे. प्रसिद्ध कवी, गीतकार अरुण म्हात्रे स्त्री जीवना संदर्भातील कविता व गाणी सादर करणार आहेत. याशिवाय, विविध लोकवस्तीतील मुली - मुले - महिला, महिलांच्या प्रश्नावर नाटिका, नृत्य, पपेट शो, अभिवाचन, समतेची गाणी आणि एकपात्री प्रयोग आदी कार्यक्रम सादर करणार आहेत.
 
या कार्यक्रमात प्रवेश विनामूल्य असून, होळीच्या पूर्वसंध्येला होणा-या या रंगारंग स्त्री जागरात विविध सामाजिक संस्था - संघटनांचे कार्यकर्ते, संस्थेचे हितचिंतक व संवेदनशील ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समता विचार प्रसारक संस्थेच्या सचिव हर्षलता कदम व सह सचिव अनुजा लोहार यांनी केले आहे.