वरिष्ठांकडून कर्मचारी महिलेचा विनयभंग


निगडी – कर्मचारी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करून तिला बाहेर फिरायला येण्यास सांगितले. तसेच मर्जीप्रमाणे न वागल्यास कामावरून काढून टाकण्याची भीती दाखवून कर्मचारी महिलेचा विनयभंग केला.


 याप्रकरणी कंपनीतील अधिका-यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


ही घटना ऑक्टोबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत प्राधिकरण निगडी येथे घडली.


याप्रकरणी ३१ वर्षीय कर्मचारी महिलेने शनिवारी (दि.२९ फेब्रुवारी) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभय नरवडेकर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राधिकरण निगडी येथे हेडगेवार भवन जवळ असलेल्या एका कंपनीमध्ये आरोपी प्रोजेक्ट हेड म्हणून काम करत होता. तर पीडित महिला कर्मचारी होती. कामाचे रिपोर्टींग करण्यासाठी फिर्यादी महिला आरोपीकडे जात असे त्यावेळी ‘तू मला खूप आवडतेस, आपण दोघे फिरायला जाऊ’ असे म्हणत.
तसेच आरोपी शरीरसुखाची मागणी करीत असे. ‘बाहेर फिरायला जाऊ, जेवण करू’ असे म्हणून वारंवार महिलेला त्रास देत असे. तसेच आपल्या मनाविरुद्ध वागल्यास आरोपीने फिर्यादी महिलेला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली होती. 


याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.