कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं


नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi speech) यांनी आज रात्री आठ वाजता संपूर्ण देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कोरोनाचा सामना करण्यासंदर्भात देशातील नागरिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. भारतात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे (PM Narendra Modi speech). येत्या *रविवारी म्हणजेच 22 मार्च रोजी सकाळी 7 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार* असल्याची मोठी घोषणा नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.


नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे


1. प्रत्येक भारतीयाने सतर्क राहणं जरुरीचं


“गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या विविध बातम्या आम्ही बघत आणि एकत होतो. या दोन महिन्यात भारताच्या 130 कोटी नागरिकांनी कोरोना सारख्या महामारीचा खंबीरपणे लढा दिला आहे. सर्वांनी सावधगिरी बाळगण्याचा पुरेपूर प्रयत्नही केला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून असं वातावरण निर्माण झालं की, आपण संकंटापासून वाचलेलो आहोत. असं वाटतं सगळं ठिक आहे. मात्र, ते खरं नाही. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने सतर्क राहणं जरुरीचं आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


2. ‘मला आपले पुढचे काही आठवडे हवे आहेत’


“देशवासियांकडून मी जेव्हा कधी काहीही मागितलं तेव्हा मला त्यांनी नाराज केलं नाही. ही आपल्या आशीर्वादची ताकद आहे. आपण सगळे मिळून आपल्या निर्धारित लक्षाच्या पाठिमागे चालत आहेत. काहीवेळा प्रयत्न यशस्वीही होतो. यावेळी कोरोनाशी लढाई करण्यासाठी मला आपले पुढचे काही आठवडे हवे आहेत”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.


3. संयम आणि संकल्प महत्त्वाचा


“कोरोनाला रोखण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने संयम आणि संकल्प ठेवावा. 130 कोरोड भारतीयांनी आपण आपल्या कर्तव्याचं पालन करणार, असा संकल्प करावा. स्वत: संक्रमित होण्यापासून वाचणार आणि इतरांनाही वाचवणार आहोत, असाही संकल्प करावा. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संयम ठेवणं जरुरीचं आहे. आपला संयम आणि संकल्प कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी खूप मोठी भूमिका बजावणार आहेत”, असं मोदी म्हणाले.


4. नागरिकांनी घराबाहेर पडू नये


नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, घरातून बाहेर पडू नये. जर जास्त आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन मोदींनी केलं.


5. सरकारी अधिकारी, पत्रकार, लोकप्रतिनिधींची सक्रियता आवश्यक


“जे सरकारी सेवा, रुग्णालय, लोकप्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्यांची सक्रियता आवश्यक आहे. मात्र, इतर लोकांनी घरी थांबांवं”, असं मोदींनी आवाहन केलं.


6. वयस्कर व्यक्तींनी घराबाहेर पडून नये


“घरातील 60 ते 65 वर्षीय व्यक्तींनी घराबाहेर पडू नये”, असंही आवाहन नरेंद्र मोदींनी केलं.


7. जनता कर्फ्यू, जनतेला एक दिवस घरी राहण्याचं आवाहन


“जनता कर्फ्यू म्हणजे जनतेसाठी जनतेकडून स्वत:वर लावण्यात आलेला कर्फ्यू. या रविवारी म्हणजेच 22 मार्च रोजी सकाळी 7 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत सर्व देशवासियांना जनता कर्फ्यूचं पालन करायचं आहे. जनता कर्फ्यू दरम्यान कोणत्याही नागरिकाने घराबाहेर पडू नये. फक्त जे अत्यावश्यक सेवांशी जोडलेले आहेत त्यांनाच घराबाहेर जावं लागेल”, असं मोदी म्हणाले.


8. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी आभार व्यक्त करा


“अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी रविवारी संध्याकाळी 5 वाजता घरातील खिडकी, बाल्कनीत 5 मिनिटे उभं राहा. जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होणाऱ्यांचं आभार व्यक्त करा. टाळ्या वाजवून, घंटी वाजवून त्यांचं अभिनंदन करा”, असं मोदींनी आवाहन केलं.


9. कामगारांचे पगार कापू नका


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यापारी आणि श्रीमंतांना मोठं आवाहन केलं. रविवारी संचारबंदीदरम्यान कामगार कामावर येणार नाहीत. त्यामुळे त्या दिवसाचे कामगारांचे पगार कापू नका, असं मोदींनी सांगितलं.


10. आवश्यक वस्तूंचा साठा करु नका


नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला आवश्यक वस्तूंचा साठा न करण्याचं आवाहन केलं. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू देणार नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. दूध, अन्न-धान्य, औषधांची कमतरता भासू नये यासाठी सरकारची उपाययोजन असणार असल्याचं मोदी म्हणाले.