अंबरनाथ शिव मंदिर सुशोभीकरणासाठी १५ कोटींचा निधी


अंबरनाथ : येथील शिव मंदिराचे सुशोभीकरण करण्यासाठी शासनाच्या निधीतून १५ कोटी रुपये देण्यात येतील अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली तर मंदिराचा कायापालट करण्यासाठी हातभार लावण्याचे आश्वासन खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी दिले. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित पाचव्या अंबरनाथ शिव मंदिर आर्ट फे स्टि वलचे उद्घाटन खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.


कार्यक्रमामध्ये शिव मंदिराचा कायापालट करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखडयाचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सादरीकरण केले. 'लोकसत्ता' माध्यम प्रायोजक असलेल्या या फेस्टिवलमध्ये पहिल्या दिवशी सूरसाम्राज्य' कार्यक्रमातून वैशाली सामंत यांच्यासह नवोदित मराठी गायकांनी प्रेक्षकांची मने जिंकली.


`सूर साम्राज्य' या कार्यक्रमाची सुरुवात विश्वजित बोरवणकर याने गणेश वंदनेनी केली. यावेळी कलाकारांनी चित्तथरारक नृत्य सादर केले. पुढे ‘सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या राजू नदाफ याने 'मल्हार वारी' गाणे सादर करत कार्यक्रमात रंग भरला. प्रसेनजीत कोसंबी याने 'लल्लाटी भंडारगाणे गात पहिल्या काही मिनिटांत प्रेक्षाकांना ठेका धरण्यास भाग पाडले. त्यानंतर आपल्या गावरान आवाजासाठी प्रसिद्ध असलेल्या नागेश मोरवेकर, कविता राम हिने गाणे सादर केले. डान्सिंग सुपरस्टार म्हणून परिचित असलेल्या चावट बाईज यांनीही नृत्य सादर केले.


सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेल्या अक्षय्या अय्यर हिने चांदण चांदण झाली रात हे आगरी गीत सादर करून त्यावर प्रेक्षाकांना नृत्य करण्यास भाग पाडले. अक्षता सावंतने एकाहून एक सरस कोळी गीते सादर करून कार्यक्रमात आणखी रंग भरले. यावेळी तरुण तरुणींनी मंचासमोर गीतांवर नृत्य करत फेस्टिवलचा आनंद लुटला. लहानग्यांत मॉनिटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या हर्षद नायबळ याने गवळण सादर केली. दिल्लीहून आलेल्या जगनदीप या कलाकाराने घागरा नृत्यातून अनोखी कला सादर केली.


वैशाली सामंत हिनेही फेस्टीवलला हजेरी लावली. तिने 'ऐका दाजीबा' आणि कोंबडी पळाली' गाणे सादर केले.


खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रथम एकनाथ शिंदे यांचा मुलगा म्हणून राजकारणात ओळख मिळवली असली तरी दुसऱ्यांदा निवडून आल्यावर श्रीकांत यांनी आपली एक नवीन ओळख निर्माण केली आहे. दिल्लीत एक कर्तृत्ववान खासदार म्हणून त्यांची नवी ओळख आहे, असे सांगत संभाजी राजे यांनी त्यांचे कौतुक केले.


या महोत्सवातून जपण्याचे काम शिंदे यांनी केले असून त्यांच्या कामाला आपण हातभार लावणार असल्याचेही संभाजी राजे यांनी सांगितले.


शिवमंदिर परिसरात झगमगाट : महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पूर्वेकडील शिवाजी चौकापासून शिवमंदिर रस्ता नागरिकांच्या गर्दीने फुलून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकहुतात्मा चौक परिसरात सुशोभीकरण करण्यात आले आहे. स्वामी समर्थ चौकापासून कार्यक्रम स्थळापर्यंत आकर्षत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्राचीन शिवमंदिर परिसर रोषणाई बरोबरच विविध रंगी पडदे लावून सजविण्यात आला होता.


हर्षद नायबळचा सत्कार : हर्षद नायबळ या लहानग्या गायकाने छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतापगडाचा पोवाडा सादर केला.


यामुळे खासदार भोसलेही भारावले होतेत्याचा पोवाडा सादर झाल्यानंतर संभाजी राजे यांनी सूत्रसंचालकांना सांगत हर्षदला पुन्हा स्टेजवर बोलावून त्याचा सत्कार केला.