करोना विषाणू बाधित रूग्णांविषयीची वस्तुस्थिती  


नवी मुंबई : कोरोना विषाणूच्या (कोव्हिड 19) फैलावावर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आढळलेल्या करोना बाधित रूग्णाविषयी प्रसिध्द बातम्यांच्या अनुषंगाने वस्तुस्थितीदर्शक माहिती देण्यात येत आहे.


सदर करोना बाधित रूग्ण हा फिलिपाईन्स देशाचा नागरिक असून 40 दिवसांच्या प्रवासी परवाना परवानगीनुसार 3 मार्च ते 12 मार्च 2020 या कालावधीत धार्मिक कामासाठी वाशी येथील नूर मशीद या ठिकाणी तात्पुरत्या वास्तव्यास होता. 12 मार्च रोजी सायंकाळी संशयीत लक्षणांमुळे हा प्रवासी खाजगी रूग्णालयात तपासणी व उपचाराकरिता गेला असता, तेथून त्यास कस्तुरूबा रूग्णालय, मुंबई येथे संदर्भित करण्यात आले. त्याठिकाणी सदर रूग्णाची तपासणी केली असता त्याचा करोना व्हायरस पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला व त्यास त्या ठिकाणीच भरती करण्यात येऊन त्यावर सुयोग्य उपचार सुरू करण्यात आले. या रूग्णाची प्रकृती स्थिर आहे.


या रूग्णासोबत नूर मशीद वाशी येथे असणारे इतर 7 सहकारी प्रवासी मुंबई येथे ट्रान्झिट कॅम्प 2, हंस रोड, मदनपुरा, मदिना कंपाऊंड येथील मशिदीत राहण्यास गेले आहेत. त्या सहकारी सहप्रवाशांशीही संपर्क साधण्यात आला असून त्यांच्यापैकी कुणालाही या आजाराची लक्षणे नाहीत. तथापि त्यांच्या पुढील चाचण्या व उपचाराबाबत बृहन्मुंबई आरोग्य विभागास तसेच एकात्मिक आजार सर्वेक्षण कार्यक्रम, आरोग्य सेवा पुणे यांना कळविण्यात आले आहे व त्यांच्यामार्फत पुढील कार्यवाही सुरू आहे.


या अनुषंगाने सदर रूग्ण वाशीतील ज्या नूर मशिदीत वास्तव्यास होता त्या व्यवस्थापनास विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सर्वोतोपरी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले होते, त्यानुसार कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे. तसेच त्या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही लक्षणे आढळल्यास तपासणी करून घेण्यात येत आहे.


अशाच प्रकारे सेक्टर 19, नेरूळ येथील आर्मी कॉलनी मध्ये राहणा-या बंगलोर येथे करोना विषाणूग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या दोन व्यक्तींचीही कस्तुरूबा रूग्णालय, मुंबई येथे करोना लागण होण्याबाबत तपासणी करून घेण्यात आली असून त्यांना लागण झाली नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.


याशिवाय, माईंड स्पेस ऐरोली येथे करोना विषाणूग्रस्त एक रूग्ण असल्याचे आढळून आले असून हा रूग्ण कल्याण मधील रहिवाशी आहे. त्यास सुयोग्य उपचारार्थ कस्तुरूबा रूग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. या अनुषंगाने माईंड स्पेस ऐरोली येथील व्यवस्थापनाने एनसीडीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाप्रमाणे ही इमारत रिकामी करून संपूर्ण निर्जंतुकीकरण करून घेतली आहे. तेथील कर्मचा-यांनाही घरातून काम करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.


यामध्ये करोनाचा प्रसार टाळणे हे महत्वाचे असून त्यादृष्टीने साध्या साध्या गोष्टीत काळजी घेऊन आपण याचा प्रसार रोखू शकतो. हा आजार खोकला अथवा शिंकण्यातून बाहेर पडणारे थेंब आजुबाजूच्या पृष्ठभागावर पडून त्या पृष्ठभागास स्पर्श केल्याने हाताला चिकटतात व त्याच हाताने वारंवार चेहरा, नाक, डोळे चोळण्याच्या सवयीतून पसरतो हे लक्षात घेऊन शिंकताना अथवा खोकताना नाकातोंडावर स्वच्छ हातरूमाल धरणे गरजेचे आहे. एन 95 या विशिष्ट मास्कचा वापर केवळ करोनाग्रस्त रूग्णाच्या संपर्कात असणा-या व्यक्तींनीच करणे आवश्यक आहे, मात्र सर्वांनी खोकताना, शिंकताना हातरूमालाचा निश्चित वापर करावा. त्याचप्रमाणे आपले हात वारंवार स्वच्छ धुणे तसेच श्वसनसंस्थेचे विकार असणा-या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे आवश्यक आहे.  याविषयीची वस्तुस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसून दक्षता घेत काळजी घेणे महत्वाचे आहे. खबरदारी म्हणून नागरिकांनी गर्दीत मिसळणे टाळण्याचे आवाहन महापौर श्री. जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.