कल्याण : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी म्हणजे २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत संपुर्ण देशातील जनतेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले आहे .
या पूर्वीच महाराष्ट्र राज्य शासनानेही २० मार्च ते ३१ मार्च दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज सकाळी ११ पासुनच कल्याण पूर्वे व पश्चिम परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून या बंद मध्ये सहभाग नोंदवला आहे.
कल्याण पूर्वेतील नेहमीच गजबजलेला तिसगांव नाका व पश्चिम येथील स्थानक,शिवाजी चौक परिसर सकाळपासुनच निर्मनुष्य दिसू लागला होता.
मुख्य पुना लिंक रोड व कल्याण मुरबाड वर वाहनांची वर्दळही तुरळक प्रमाणात असून रिक्षा स्टँडवर सकाळी रिक्षांची रांग लागलेली होती परंतु या रिक्षा साठी प्रवासीच नसल्याने रिक्षाचालकही हतबल झाल्याचे दिसून आले.
या बंद मध्ये हॉटेल्स, मद्य विक्रीची दुकाने मांस विक्रेतेही सहभागी असल्याचे दिसत आहे.