असा रंगला 'ज्येष्ठ महोत्सव


ठाणे : "कलावंत हा जणू आपल्या कलेतुन समाजसेवाच करत असतो. साहित्यिक आपल्या साहित्यातून, शिल्पकार आपल्या शिल्पातुन, चित्रकार आपल्या चित्रातुन, वादक आपल्या वादनातुन एक प्रकारे समाजसेवाच करीत असतो. कार्यक्रमांतील ज्येष्ठ व्यक्तींचं कार्यकर्तृत्व पाहुन असे वाटतं , समाजात सर्वच स्तरांवर अशी अनेक ज्येष्ठ मंडळी प्रसिद्धीपासून दूर राहून प्रामाणिकपणे काम करीत आहेत, हे बघून समाधान मिळालं. अशा व्यक्तींचा परिचय व्यास क्रिएशन्स यांनी करून दिला, त्यांचा गौरव केला म्ह्णून व्यासचे मी कौतुक करते, धन्यवाद देते."
व्यास क्रिएशन्स आयोजित विसाव्या ज्येष्ठ महोत्सवामध्ये प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नाट्यकर्मी, गायिका फैयाज यांनी मुलाखतीतून हे उदगार काढले. कवी, गीतकार अरुण म्हात्रे यांनी त्यांना बोलते केले. या महोत्सवात विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची गुढी उभारणाऱ्या एकूण वीस व्यक्तींचा, त्यांच्या कार्याचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सामाजिक बांधिलकीचे भान जपणाऱ्या आमच्या ज्येष्ठ-श्रेष्ठ मंडळींना शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ रंगकर्मी, फैयाज, लेखिका-निरुपणकार धनश्री लेले, कवी-गीतकार अरुण म्हात्रे, ज्येष्ठ साहित्यिक, भ्रमंतीकार वसंत वसंत लिमये आणि गजलकार अप्पा ठाकूर हे आवर्जून उपस्थित होते. त्याचप्रमाणे ठाण्याचे महापौर मा. नरेश म्हस्के हे वेळातवेळ काढून ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. एकूण तीन सत्रांचे सुंदर आयोजन करताना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ मंडळींना कृतार्थ जीवन पुरस्कार, सेवारत्न दांपत्य पुरस्कार, ज्येष्ठ सेवारत्न पुरस्कार आणि ज्येष्ठरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सौ धनश्री लेले यांनी आपले मनातले गुज उलगडून दाखवले. त्या म्हणाल्या.
"समोरची ज्येष्ठ मंडळी पाहुन् असे वाटते की हिरवीगार बिल्वपत्र बसली आहेत जणु.  जी ऊर्जा आम्हाला मिळते ,ती तुमच्याकड़ून  आमच्यापर्यंत पोहोचते . ही ऊर्जा कशी टिकवायची , हे ज्येष्ठ मंडळींकडून शिकण्यासारखे आहे. ज्येष्ठत्व केव्हा सुरु होते?  यांवर विनोबांनी उत्तर दिलं की , जेव्हा नवीन काही शिकण्याची  इच्छा संपून जाईल तेव्हा समजावं, वय झालं.!   ज्येष्ठत्व हे वयाने येते, पण श्रेष्ठत्व हे वागणूकीने येत असतं "
तर ठाण्याचे महापौर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. " ज्यांनी मला शिकविले त्या शिक्षिका बर्वे बाई यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचा व्यास क्रिएशन ने सेवारत्न पुरस्कार देऊन गौरव केलात, यामुळे आनंद झाला ... शिक्षक हे नवीन पिढ़ी घडवत असतात. विद्यार्थी म्हणून माणुस म्हणून शिक्षक आपली जड़णघडण करतात. आज मी जे काही आहे  ते माझ्या शिक्षकांमुळेच...असे बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत ठाण्यात जे खरेच पुरस्कारासाठी पात्र आहेत अशा व्यक्तिना शोधून त्यांचा सन्मान करुन् अशा सेवाव्रती व्यक्तींना प्रकाशात आणण्याचे काम व्यास क्रिएशनने केलेले आहे.
मूळचे ठाण्याचे असणारं एकी प्रसन्न व्यक्तिमत्व वसंत वसंत लिमये यांनी आपल्या ठाण्यातील तसेच शिक्षण घेतानाच्या आठवणी सांगितल्या. त्यांच्या प्रवासाबदल, भटकंतीचे, हिमायात्रींचे  किस्से सांगितले. 'वय जसे पुढे सरत जाते तसे आपले क्रीड़ांगण बदलत जाते, बदलले तरी हरकत नाही , नवीन काही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे ते म्हणाले. तर गजलकार अप्पा ठाकूर यांनी जीवनाचे वर्म आपल्या गजल गायनातून उलगडून उपस्थितांची वाहवा मिळवली.'
तिन्ही सत्रांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. सारेच भारावले होते.  सोहळ्याच्या विविध टप्प्यांवर 'पर्यटन' या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले आणि  'राज्ञी' या संकल्पनेचा शुभारंभ मोठ्यात थाटामाटात पार पडला. या सुंदर कार्यक्रमाला मा अण्णासाहेब टेकाळे, श्यामसुंदर पाटील आणि आसावरी फडणीस, डॉ सुनील सोनार, डॉ स्मितेश शहा हे आवर्जून उपस्थित होते. त्यांनी देखील आपल्या मनोगतातून आपले विचार प्रकट केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नुपूर नृत्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन नृत्यांच्या माध्यमातून पेश केले तर कार्यक्रमाचा समारोप कनिरा आर्टस् या संस्थेने सादर केलेल्या 'सफर गीतमाला' या अभिनव गीतांनी झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आणि सुंदर सूत्रसंचालन आघाडीचे निवेदक राजेंद्र पाटणकर यांनी केले. 'पुन्हा पुढील वर्षी नक्की भेटूया' अशा आश्वासक नोट वर कार्यक्रमाची सुरेख सांगता झाली.