ठाणे : नौपाडा कोपरी प्रभाग समितीतंर्गत नागसेन नगर, खारटन आणि चेंदणी कोळीवाडा येथे कोराना कोव्हीड 19 ची बाधितांची वाढती संख्या लक्षात घेवून महापालिका आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनुसार आता नागसेननगर आणि खारटन रोड येथे कोव्हीड वॅारियर्स नेमण्यात आले आहेत. दरम्यान शहरामध्ये जवळपास 600 पेक्षा जास्त कोव्हीड वॅारियर्स गस्तीवर आहेत.
महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी प्रत्येक प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोव्हीड वॅारियर्स नेमून त्यांच्यामार्फत नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, त्या परिसरात कोणाला कोरोनाची लक्षणे आहेत का याची माहिती घेवून त्यांना तेथील फिव्हर ओपीडीमध्ये जाण्यास प्रवृत्त करणे आदी कामगिरी करवून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी परिमंडळ उपायुक्त संदीप माळवी आणि नौपाडा-कोपरी सहाय्यक आयुक्त श्रीमती प्रणाली घोंगे, कार्यकारी अभियंता प्रदीप घाटगे यांनी नागसेननगर, खारटन रोड येथे भेट देवून या सर्व कोव्हीड वॅारियर्सना आवश्यक त्या सूचना दिल्या.
दरम्यान चंदणी कोळीवाडा परिसरात जन कल्याण समितीमार्फत विशेष सर्वेक्षण आणि औषध वाटप करण्यात येत असून आज सकाळी त्या पथकांशी समन्वय साधून हे सर्वेक्षण कसे प्रभावी करता येईल याविषयी सूचना देण्यात आल्या आणि ते करीत असलेल्या कामाबद्दल त्यांचा परिमंडळ उपायुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. यावेळी जनकल्याण समितीचे संतोष धुमक, अजय जोशी, सुजय पतकी आदी उपस्थित होते.