पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता दहावीची परीक्षा होणार आहे. मंगळवार (दि. ३ मार्च) पासून या परीक्षेला सुरुवात होत असून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी राज्यातील चार हजार ९७९ केंद्रावर परीक्षा देणार आहेत.
पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार ही परीक्षा होत आहे. दहावीच्या परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार 898 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. त्यामध्ये नऊ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी तर सात लाख ८९ हजार ८९४ विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. राज्यातील २२ हजार ५८६ माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या मानवातील ताण कमी होण्याच्या उद्देशाने यंदाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. बहुतांश विषयांच्या परीक्षेदरम्यान खंड ठेवण्यात आला आहे. यावर्षीपासून दहावीची प्रत्येक विषयाची ८० गुणांची लेखी तर २० गुणांची तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे.
अनेक विद्यार्थी परीक्षेचे दडपण घेतात. त्याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय आणि जिल्हा स्तरावर समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. यावर्षी नऊ हजार ४५ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी २७३ भरारी पथकांची नेमणूक केली आहे. त्याचबरोबर विशेष भरारी पथक, महिला पथकांचीही स्थापना केली आहे. परीक्षेपूर्वी अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.