अँटी कोरोना टास्क फोर्स च्या महाराष्ट्र-गोवा अध्यक्षपदी भारती चव्हाण


पिंपरी – अवघे जग कोरोना  जागतिक महामारीच्या विळख्यात सापडले आहे. त्याचा सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार त्याचबरोबर स्थानिक प्रशासन संस्था सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरिकांसाठी अनेक योजना सुरु करीत आहे. या योजनांचा लाभ गरजू लोकांपर्यंत पाहोचविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर ॲण्टी कोरोना टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या महाराष्ट्र-गोवा अध्यक्ष व राज्यप्रमुखपदी भारती चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


संस्थेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष जितेंद्र चौधरी यांनी  चव्हाण यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. ॲण्टी कोरोना टास्क फोर्स (ACTF) ही स्वायत्त संस्था (Autonoums Body) सामाजिक क्षेत्रात देशभर कार्यरत आहे. देशातील बहूतांश राज्यात कोरोनाविषयी या संस्थेचे सामाजिक कार्य सुरु झाले आहे. ‘एसीटीएफ’चे महाराष्ट्र समन्वयक म्हणून सुरज गायकवाड (अहमदनगर), गोवा समन्वयक महेश राणे (म्हापसा) यांची नियुक्ती एसीटीएफच्या महाराष्ट्र अध्यक्षा भारती चव्हाण यांनी केली आहे.


तसेच राज्य सल्लागार म्हणून माजी कुलगुरु डॉ. एस. एन. पठाण (पुणे), ज्येष्ठ साहित्यिक डॉ. क्रांती महाजन (अमरावती), विकास पाटील (पर्यावरण तज्ज्ञ, पिंपरी-चिंचवड), कामगार नेते हौसी प्रसाद शर्मा (ठाणे) या ज्येष्ठ व्यक्ती मार्गदर्शन करीत आहेत.त्याचबरोबर धनंजय जगताप (पिंपरी-चिंचवड), माऊली सोनवणे (पुणे जिल्हा), संजय गोळे (पुणे शहर) यांची जिल्हा शहर समन्वयकपदी नियुक्ती केली आहे.


या संस्थेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक खेड्यात गरजू नागरिकांपर्यंत संपर्क साधण्यात येत आहे. त्यांना संस्थेच्या स्वयंसेवकांमार्फत जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, जेवण, मास्क, वैद्यकीय मदत, सॅनिटायझर, सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच कोरोना रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचा-यांसाठी पीपीई किट व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.


तसेच कोरोना या आजाराविषयी जनजागृती करण्यात येत आहे. देशातील 70 टक्के जनता ग्रामीण व निमशहरी भागात आहे. त्यांच्याशी जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर ग्रामप्रमुखामार्फत समन्वय साधून सरकारच्या योजनांचा लाभ गरजूंना मिळवून देण्यात येईल यासाठी ही संस्था कोणत्याही व्यक्ती वा संस्थांकडून मदत, देणगी घेणार नाही. परंतू स्वयंसेवकांमार्फत जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी व त्याचा प्रत्यक्ष गरजू नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी मदत करील.