झोपडपट्टी व दा़टलोकवस्तीमध्ये लक्ष देण्याच्या सूचना - महापालिका आयुक्त


ठाणे : वागळे प्रभाग समितीमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज वागळे प्रभाग समितीमधील अनेक ठिकाणी पाहणी करून झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये याक़डे जास्त लक्ष देण्याच्या सूचना केल्या.


आज दुपारी श्री. सिंघल यांनी वागळे इस्टेट मध्ये साठे नगर, रोड नं. 22, रोड नं. 28, सी. पी. तलाव या ठिकाणी भेट दिली. या वेळी त्यांनी वागळे प्रभाग समितीमध्ये कोणत्या विभागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे, त्याची कारणे काय आहेत याचा आढावा घेवून झोपडपट्टी आणि दाट लोकवस्ती असलेल्या भागामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचा दिल्या.


त्याचबरोबर ज्या ठिकाणी बोधित रूग्ण सापडले आहेत त्या परिसरात तातडीने सर्वेक्षण सुरू करून त्यामधील संशयित किंवा कोरोना सदृष्य लक्षणे आढळलेल्या व्यक्तींनी भायंदरपाडा किंवा कासारवडवली या ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत परिमंडळ उप आयुक्त संदीप माळवी, सहाय्यक आयुक्त विजयकुमार जाधव, कार्यकारी अभियंता धुमाळ, उप अभियंता आणि इतर उपस्थित होते.