ठाणे जिल्हा पालक मंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
कल्याण : कल्याण डोंबीवली महापालिकेला साथरोग निर्मुलनासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात देईल असे आश्वासन ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पालिकेत संपन्न झालेल्या एका बैठकीत दिले.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पालिका क्षेत्रातील सद्य स्थितिचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सद्या सर्वत्र पसरत चाललेल्या कोरोना साथीबाबत प्रतिंबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात संपन्न झालेल्या या आढावा बैठकीत त्यांनी हे आश्वासन दिले.
महापालिकेने फवारणी कामगारांना मास्क,
हॅन्डग्लोज, सॅनीटायझर इ. आवश्यक सामुग्री पुरवावी असे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित अधिका-यांना दिले.
महापालिका सध्याच्या परिस्थीतीत नागरिकांना सेवा देण्याच्या दृष्टीकोनातुन अन्सारी चौक, चिकनघर, शास्त्रीनगर, ठाकूरवाडी, पाटकर, मढवी, कोळसेवाडी, तिसगाव या आठ ठिकाणी ‘’तापाचे दवाखाने’’ सुरू करत असून सर्दी, कोरडा खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास व घसादुखी यासारखी लक्षणे असलेल्या व्यक्तिनांच या क्लिनीक मध्ये सकाळी ९.३० ते १.०० या वेळेत जाऊन तपासणी करून घेता येणार आहे अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.
जे रूग्ण कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कात आले परंतू त्यांना कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत अश्या रूग्णांना शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल करावे व लक्षणे आढळून आलेल्या रूग्णांस महापालिकेबरोबर संमजस्याचा करार केलेल्या नियॉन हॉस्पीटल, पडले गाव, शिळ रोड, डोंबिवली पुर्व या रूग्णालयात दाखल करावे अश्या सुचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या बैठकीत केली.
सदर बैठकीस पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रिकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार गणपत गायकवाड, आमदार राजू पाटील तसेच विभागीय आयुक्त, कोकण विभाग, शिवाजीराव दौंड, ठाणे जिल्हाधीकारी राजेश नार्वेकर,नियॉन हॉस्पीटलचे डॉक्टर सुशिल दुबे, मिलींद शिंदे, डॉ. प्रशांत पाटील अध्यक्ष आयएमए कल्याण, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) विजय पगार, शहर अभियंता सपना कोळी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजु लवंगारे, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, महापालिका सचिव संजय जाधव तसेच महापालिकेचा इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.
कल्याण डोंबिवली परिसरात ही कोरोणाचे रुग्ण वाढत असल्यामुळे डोंबीवली शहरा प्रमाणेच कल्याण पूर्व आणि पश्चिमेतही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी करण्याच्या निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याने आज सायंकाळी ६ वाजेपासुन या निर्णयाच्या अंमलबजावणी बाबतचा आदेश संबंधीत प्रभाग क्षेत्र अधिकारी तसेच पोलिस यंत्रणेला देण्यात आला आहे.