सामाजिक द्वेष पसरवणारी पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


निगडी – ठराविक समाजाच्या नागरिकांकडून भाजी खरेदी करू नये, तसेच त्यांना आपल्या गल्लीत येऊ देऊ नका, अशा आशयाची व्हाट्स अप ग्रुपमध्ये एकाने पोस्ट केली.


याबाबत त्या सदस्यासह ग्रुप अॅडमिनवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सुशीलकुमार सिमरूराम खैरालिया (वय ५४) आणि अमित मनोज भालेराव (वय ३३, दोघेही रा. ओटास्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 


याप्रकरणी पोलीस कर्मचारी विकास निलचंद दुधे यांनी शनिवारी (दि.४) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित भालेराव हा ‘अमित भालेराव मित्र परिवार’ या ग्रुपचा अॅडमीन आहे. तर आरोपी सुशीलकुमार हा त्या ग्रुपचा सदस्य आहे. 


आरोपी सुशीलकुमार याने ‘अमित भालेराव मित्र परिवार’ या व्हाट्स अप ग्रुपवर विशिष्ट धर्माच्या नागरिकांकडून काही साहित्य खरेदी करू नका. त्यांना आपल्या गल्लीमध्ये येऊ देऊ नका, अशी समाजामध्ये द्वेषभावना पसरविणारी माहिती टाकली. 


या पोस्टला अॅडमीन हा देखील जबाबदारी असल्याने पोलिसांनी ग्रुप अॅडमीन आणि सदस्य या दोघांवरही भारतीय दंड विधान कलम 153 (अ) (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. 


निगडी पोलीस तपास करीत आहेत.