ठाणे महापालिका मुख्यालयात बॉडी निर्जंतुकीकरण यंत्र प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित


ठाणेमहापालिका मुख्यालयामध्ये शरीर निर्जंतुकीकरण मशीन बसविण्यात आले आहे.


ठाणे : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कार्यालये, दवाखाने आदी गर्दीच्या ठिकाणी नागरिक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे महापालिकेच्यावतीने बोरोप्लास्ष्ट कंपनीचे संपूर्ण शरीराचे निर्जंतुकीकरण करणारे यंत्र महापालिका मुख्यालयात प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्यात आले आहे.


कोरोनाविरोधात लढण्यासाठी बोरोप्लास्ष्ट या कंपनीने बॉडी निर्जंतुकीकरण यंत्र तयार केले आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने हे मशीन प्रायोगिक तत्त्वावर मुख्यालय येथे उभारण्यात आले आहे.


कोरोनाच्या या अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच येणाऱ्या नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून महापालिका प्रशासन युद्ध पातळीवर उपाययोजना करत असून या उपाययोजनेंतर्गतच खबरदारी म्हणून हे निर्जंतुकीकरण मशीन उभारण्यात आले आहे.


या अत्याधुनिक मशीनमध्ये 500 लिटर पाण्याची टाकी लावून त्यामध्ये पॉलिमेरिक बेक्यूनाइड हैड्रोक्लोराईडचे 0.5 टक्के हे प्रमाण वापरून निर्जंतुकीकरण करण्यात येते.


या अत्याधुनिक निर्जंतुकीकरण मशीनमध्ये व्यक्तीने प्रवेश केल्यानंतर सेन्सर कार्यान्वित होऊन स्प्रे सुरू होतो.10 सेकंदांमध्ये संपूर्ण शरीरावर सॅनिटाझर स्प्रे होऊन व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर निर्जंतुकीकरण केले जाते.