कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे ऑनलाईन स्व-चाचणी टूल


नागरिकांनी चाचणी करण्याचे आयुक्तांचे आवाहन


ठाणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या डिजीठाणे या डिजिटल प्रणालीद्वारे, कोरोना व्हायरसची स्व-चाचणी अर्थात लक्षण तपासण्याचे टूल सादर करण्यात आले असून प्राथमिक पातळीवरील कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी या टूलचा उपयोग होत असल्याने नागरिकांनी या टूलचा वापर करून स्व चाचणी करावी असे आवाहन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.


सदरचे टूल https://bit.ly/TmcSa या संकेतस्थळावर उपलब्ध असून महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी या ऑनलाईन स्व-चाचणी टूलचा वापर करावा असे सांगून महानगरपालिका आयुक्त श्री. सिंघल यांनी आतापर्यंत ३० हजार नागरिकांना याचा संदेश पाठविण्यात आले असून त्यातील ३००० पेक्षा जास्त नागरिकांनी ही माहिती भरून पाठविली आहे. जवळपास २ लाख लोकांना हा संदेश पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


सध्या ठाणे महापालिकेतर्फे नियोजित केलेल्या विभागीय वैद्यकीय अधिकारी संबंधित नागरिकांकडे जाऊन आरोग्य तपासणी करून पुढील योग्य तो निर्णय घेतात. अशा प्रकारे परदेशातून आलेले नागरिक अथवा कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेले नागरिक यांची तपासणी करून योग्य तो निर्णय घेतला जातो. याबाबतचा दैनंदिन अहवाल शासनास पाठविला जातो. ही तपासणी प्रशासनाला मॅन्युअल पद्धतीने म्हणजे प्रत्यक्ष कर्मचार्‍यांना पाठवून करावी लागते. यात वेळही खूप जातो. ही कार्यपद्धती व नागरिकांना माहिती देण्यास सोपे जावे याकरता कोविड -१९ चा प्रभावीपणे सामना करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षमता वाढवणे, महत्त्वपूर्ण माहिती एकत्र करणे तसेच संसर्गाला रोखण्यासाठी अधिक चांगले व्यवस्थापन करणे हा या टूलचा मुख्य हेतू आहे.


या टूलमध्ये, परदेशातून आलेल्या नागरिकांची किंवा कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची बाबत माहिती भरू शकतात. विशेष बाब म्हणजे, या टूलमुळे महानगरपालिकेला चाचणी केलेल्या नागरिकांचा रिअल टाइम डॅशबोर्डही बघता येतो व या टूलने चाचणी केल्यावर एखाद्या व्यक्तीमध्ये करोनासदृश लक्षणे ही मध्यम किंवा तीव्र रूपाची असल्यास अशा व्यक्तीचे‌ वैयक्तिक तपशील महानगरपालिकेपर्यंत त्वरित प्राप्त होऊन ताबडतोब संबंधित नागरिकाच्या घरी पथकाची भेट दिली जाईल व आवश्यक ते कामकाज जलद गतीने होईल. यामुळे महानगरपालिकेला संभाव्य संक्रमणास अधिक प्रभावीपणे शोधण्यास मदत होईल.


सदर स्व-चाचणी टूल प्रत्येकाच्या वापरासाठी मराठी, व इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे. हा टूल क्यूआर कोड रूपात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, आणि खाजगी दवाखान्यांमध्येही उपलब्ध होणार आहे. जेणेकरुन तिथेही रुग्णांना स्व-चाचणी करता येईल. या नोंदी केल्याने प्रशासनाला सतत अद्ययावत होणारा डॅशबोर्ड पाहता येईल आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कमात कमी वेळेत निश्चित दिशेने प्रयत्न करण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी ही स्व-चाचणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.