ठाण्यातील बेथनी रुग्णालय 'कोव्हीड सिमटोमॅटिक रुग्णालय' म्हणून घोषित - आयुक्त  विजय सिंघल


ठाणे :  ठाणे शहरात कोव्हीड-१९ या साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि संशयित व निश्चित निदान झालेल्या कोव्हीड रुग्णाचे नॉन कोव्हिड रुग्णांमध्ये संक्रमण टाळण्यासाठी कोव्हिड लक्षणे तसेच मधुमेह, किडनी आणि इतर व्याधी असलेल्या आणि प्रकृती अस्थिर असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ठाण्यातील बेथनी रुग्णालय 'कोव्हीड सिमटोमॅटिक रुग्णालय' म्हणून घोषित करण्याचा महत्वाचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे.


आज पासून पुढील आदेश होईपर्यंत ठाण्यातील बेथनी हॉस्पीटल रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील आय.सी.सी.यू सोडून संपूर्ण इमारत ही कोव्हीड सिमटोमॅटिक रुग्णांच्या उपचारासाठीचे रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे.


बेथनी रुग्णालयाची तळ अधिक सहा मजल्याच्या नवीन इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील आय.सी.सी.यू. या मजल्याचा वापर बेथनी रुग्णालय करणार असून या व्यतिरिक्त इतर सर्व मजल्याचा वापर ठाणे महानगरपालिकेने संदर्भित केलेल्या संशयीत कोव्हीड-१९ रुग्णांचे उपचार करण्यासाठी करण्यात येणार आहे.


सदर रुग्णांपैकी जे रुग्ण वैयक्तिक रूममध्ये ठेवण्यासारखे आहेत अशांना फक्त रुममध्ये दाखल करण्यात येणार आहे व जे रुग्ण अनस्टेबल आहेत त्यांना दुसऱ्या मजल्यावरील आय.सी.यु मध्ये दाखल करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत एका रुममध्ये एक पेक्षा जास्त रुग्ण ठेवण्यात येणार नाहीत याची दक्षता हॉस्पिटल प्रशासनाने घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाचे कोव्हीड तपासणीकरीता सँपल घेतल्यानंतर जर सदर रुग्ण कोव्हीड पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे किंवा होरायझन प्राईम हॉस्पीटल येथे हलविण्यात येणार आहे. सदर रुग्णांचे स्वॅब सँपल घेण्याची कार्यवाही बेथनी हॉस्पीटलमार्फत करण्यात येणार आहे. सदर रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना स्वखर्चाने उपचार करणे आवश्यक आहे.


बेथनी येथील नवीन इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर असलेल्या आय.सी.सी.यू. मध्ये जाण्यासाठी जुन्या इमारमतीमधून उपलब्ध असलेल्या कॉरीडोरचा वापर रुग्णांसाठी करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत नवीन इमारतीतील आय.सी.यु. मध्ये जाण्यासाठी लिफ्ट किंवा पायऱ्यांचा वापर करता येणार नाही.


दरम्यान कोव्हीड सिमटोमॅटिक (अनस्टेबल कोमॉरबिड) रुग्णांच्या उपचारासाठी केंद्रशासनाने दिलेल्या नियमावलींचे तसेच सदर रुग्णांच्या उपचारांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संरक्षणांसाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी बेथनी हॉस्पिटलच्या प्रशासनाला दिले आहेत.