सीबीआई ने वाधवान बंधूना महाबळेश्वर येथून घेतले ताब्यात


सातारा – येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्यातील आरोपी कपिल वाधवान आणि त्याचा बंधू धीरज वाधवान यांना सीबीआयच्या पथकाने महाबळेश्वर येथून ताब्यात घेतल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. लॉकडाऊन असताना खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास केल्यामुळे देशभर चर्चेचा विषय झालेल्या वाधवान कुटुंबातील सदस्यांसह २३ जणांना पाचगणी येथे क्रारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. 


वाधवान बंधूंचा विलगीकरणाचा कालावधी गेल्या बुधवारी (२२ एप्रिल) संपला. त्यानंतर त्यांना महाबळेश्वर येथील त्यांच्या बंगल्यात ठेवण्यात आले होते. सातारा पोलिसांच्या परवानगीशिवाय कोठेही न जाण्याची सूचना त्यांना देण्यात आली होती. सीबीआयच्या परवानगीशिवाय वाधवान बंधूना कोठेही जाऊ देऊ नये, अशा अशयाचे पत्र सीबीआयने साताऱ्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले होते. पोलिसांनीही सीबीआय व ईडीला पत्र लिहून वाधवान बंधूंचा ताबा घेण्याबाबत पत्र दिले होते. त्यानुसार सीबीआयच्या पथकाने आज वाधवान बंधूंना ताब्यात घेतले.


वाधवान बंधूंना ताब्यात घेताना सीबीआय़ला सातारा पोलिसांनी पूर्ण सहकार्य केले. वाधवान बंधूंच्या अटकेची प्रक्रिया सुरू असून त्यांना मुंबईला आणण्यासाठी पोलीस एस्कॉर्ट वाहन आणि एक पोलीस अधिकारी अधिक तीन पोलीस अशी सुरक्षा व्यवस्थाही पुरवली आहे, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान, वाधवान बंधूंना खंडाळा ते महाबळेश्वर प्रवासासाठी परवानगी देणारे पत्र देणारे गृह खात्याचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीचा अहवाल अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक हे आज (रविवारी) किंवा उद्या (सोमवारी) सादर करतील, अशी माहितीही देशमुख यांनी दिली आहे.


दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान आणि त्यांचे बंधू धीरज वाधवान यांना २७ जानेवारीला अटक करण्यात आली होती. दिवंगत कुख्यात गुन्हेगार इक्बाल मिर्ची यांच्याशी संबंध असल्यावरून ईडीने ही कारवाई केली होती. मनी लॉन्डरिंग कायद्याखाली वाधवान यांना अटक झाली होती. त्यानंतर मुंबईतील पीएमएलए कोर्टाने २१ फेब्रुवारीला वाधवान यांना सशर्त जामीन मंजूर केला होता.


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्र आणि देशात लॉकडाऊन सुरू असताना वाधवान बंधू आणि त्याच्या कुटुंबाने गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ यांच्या विशेष परवानगीचे पत्र  मिळवले आणि या पत्राच्या साहाय्याने सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आलेल्या


असतानाही वाधवान बंधू. त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि नोकरवर्ग यांनी आधी मुंबई ते खंडाळा आणि तिथून पुढे महाबळेश्‍वर असा बेकायदेशीर प्रवास केला. परंतु महाबळेश्‍वर दरम्यानच्या पोलिसांच्या तपासणीत हे प्रकरण उघडकीस आल्याने २३ जणांविरुद्ध महाबळेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय त्यांच्या पाच आलिशान मोटारीही जप्त करण्यात आल्या. त्यानंतर वाधवान कुटुंबातील २३ जणांना एका हायस्कूलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले होते.


वाधवान कुटंबीयांच्या कारंटाइनची मुदत २२ एप्रिलला संपत असल्याने पोलीस खात्यातर्फे ईडी आणि सीबीआय यांना पत्र लिहून त्यांना आपल्या ताब्यात घ्यावे. असे कळवण्यात आले होते. सीबीआय वाधवान कुटुंबीयांना घेऊन जात नाही तोपर्यंत वाधवान कुटुंब महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे.सीबीआयने संपर्क साधल्यानंतर वाधवान बंधूंना त्यांच्याकडे सोपवू, असे अनिल देशमुख यांनी यापूर्वीच जाहीर केले होते.