संचारबंदीत केक आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या २ तरूणीवर गुन्हा दाखल


वाकड : वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर येऊन केक घेऊन जाणाऱ्या दोन तरुणींना पोलिसांनी हटकले.  घराबाहेर फिरण्याचे कारण विचारले असता तरुणींनी पोलिसांशी हुज्जत घातली. याबाबत पोलिसांनी दोन्ही तरुणींवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.१) सकाळी वाकड परिसरात घडला.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर केवळ अत्यावश्यक वस्तू आणि सेवा पुरविणारी यंत्रणा कार्यरत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नागरिकांना घरातच बसून राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतचे आदेशही काढण्यात आले आहेत


अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर येऊन सामाजिक अंतर राखून काम होताच घरात जाण्यासाठी प्रशासनाची ना नाही असे असताना वाकड परिसरात अंदाजे २५-२६ वयाच्या दोन तरुणी घराबाहेर पडल्या. त्यानंतर त्या दोघी केक घेऊन जाताना पोलिसांच्या नजरेस पडल्या.


पोलिसांनी त्यांना घराबाहेर फिरण्याचे कारण विचारले. मात्र, कारण न सांगता तरुणींनी सरळ पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. बराच वेळ हुज्जत घातल्यानंतर वाकड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तरुणींवर गुन्हा दाखल करा, असे पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले.


गुन्हा दाखल होण्याचे ऐकताच तरुणींनी लगेच नरमाईची भूमिका घेतली. मात्र, पोलिसांपुढे हुज्जतीनंतरच्या माफीचा काहीही उपयोग झाला नाही. दोन्ही तरुणींवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे वाढदिवसाचा केक आणणे तरुणींना चांगलेच महागात पडले आहे.