वाधवान बंधूंना 'क्वारंटाईन'मधून सोडू नका, सीबीआईचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र


मुंबई – कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात समन्स बजावूनही सीबीआय न्यायालयात हजर न राहिलेल्या कपिल व धीरज या वाधवान बंधूंना पूर्वपरवानगीशिवाय ‘क्वारंटाईन’मधून सोडू नये, अशा अशयाचे पत्र केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) साताऱ्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिल्याने वाधवान बंधूंच्या अडचणीत भर पडली आहे. 


देशात लॉकडाऊन चालू असताना वाधवान कुटुंबाने गृह खात्याचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या पत्राचा वापर करून खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास आठ एप्रिलला पाच मोटारींमधून केला. महाबळेश्वर येथील दिवाण हाऊसिंग फायनान्सच्या बंगल्यात २३ जण  बाहेरून आल्याची माहिती मिळाल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली. त्यांना पाचगणी येथे क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. या बातमीने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.


दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल) व येस बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोट्याळ्यात वाधवान बंधू संशयित आरोपी आहेत. सीबीआय न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावूनही ते न्यायालयात हजर राहिले नाही. लॉकडाऊनची सबब पुढे करून त्यांनी न्यायालयात हजर राहणे टाळले, मात्र लॉकडाऊन धाब्यावर बसवून ते कुटुंबासह हवापालटासाठी महाबळेश्वरला गेले. याची गंभीर दखल घेतली आहे. क्वारंटाईनची १४ दिवसांची मुदत संपल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्याच्या हालचाली सीबीआयने सुरू केल्या आहेत.


अमिताभ गुप्ता यांची चौकशी मनोज सौनिक करणार


अधिकाराचा गैरवापर करून धनाढ्य वाधवान बंधूंना लॉकडाऊनचा भंग करण्यास मदत केल्याबद्दल सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले गृह खात्याचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांची शासनाने नेमणूक केली आहे. ही चौकशी १५ दिवसांत पूर्ण करून शासनास अहवाल सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, अमित गुप्ता यांच्याकडील विशेष प्रधान सचिव पदाचा कार्यभार श्रीकांत सिंग यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.