मुंबई – कोरोनासारख्या विषाणुजन्य आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन ३१ मे प्रर्यंत वाढविले आहे. कोरोना विषाणुवर मात करावयाची असेल तर प्रत्येकानेच खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा. आजाराचा सामना करण्यासाठी आपल्या रोगप्रतिकारक शक्तीस बळकट करा, हाताने धुण्यासाठी योग्य तंत्राचे अनुसरण करा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा. असे केल्याने कोरोनाव्हायरसचा सामना करण्यास मदत होऊ शकते.
घरीच रहा आणि सुरक्षित अंतर राखा
आपण आजारी आहात? सर्दी किंवा खोकला झालाय? मग, आपल्याला कोरोनाव्हायरसचा धोका असू शकतो म्हणून घराबाहेर जाऊ नका. त्याचप्रमाणे, इतरांशीही आपला संपर्क मर्यादित करण्याचा प्रयत्न करा. कोरोनाव्हायरसचा प्रसार थांबविण्यासाठीआपल्या आसपासच्या लोकांमध्ये किमान 3 फूट अंतर ठेवा. विशेषतः ज्यांना सर्दी खोकला असेल अशा लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.
नियमित हात धुवा
दिवसातून जास्तीत जास्त वेळा साबणाने नियमितपणे हात धुवा. यामुळे हातावरील विषाणूंच्या प्रतिबंधासाठी ते उपयोगी ठरतं. आपण अनेक वस्तूंना स्पर्श करीत असतो. ज्यामुळे आपल्या हातावर बॅक्टेरिया असतात. वारंवार नाक, तोंड, डोळ्यांना हात लावल्याने हातावरील विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करु शकतात.
घाबरुन जाऊ नका
कोरोना व्हायरसच्या भितीने घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घ्या. त्रासदायक बातम्या पाहणे टाळा. अफवांवर विश्वास ठेवू नका. त्याऐवजी, सामाजिक अंतर राखून घरी आपल्या कुटुंबासमवेत दर्जेदार वेळ घालवा, फोनद्वारे मित्रांशी संपर्क साधा आणि तुम्हाला आवडेल असे छंद जोपासा. स्वतःसाठी वेळ द्या.
शिंकताना, खोकताना रुमालाचा वापर करा
शिंकल्यानंतर तसेच खोकताना नाका-तोंडातून निघणाऱ्या तरल पदार्थांमध्ये अनेक बॅक्टेरिया असतात. त्यामुळे शिंकताना नाका-तोंडावर रुमाल किंवा टिश्यू धरा.
मास्क वापरा
सर्दी, खोकला झाल्यास आपला संसर्ग इतरांना होऊ नये यासाठी डॉक्टरी सल्ल्याने योग्य तेच मास्क वापरा. घरी आणि बाहेर दोन्ही ठिकाणी योग्य मास्कचा, योग्य प्रकारे वापर करा.
निर्जंतुकीकरणावर भर द्या
आपले घर स्वच्छ ठेवा. दरवाजाची हँडल्स, लॉक, टेबल्स, स्वयंपाक घरातील ओटा आणि सेल फोन, रिमोट, पेन, कीबोर्ड आदी वस्तूंना नियमितपणे निर्जंतुकीकरण करा. असे केल्यावर आपला चेहरा, नाक किंवा डोळे स्पर्श करणे टाळा आणि ताबडतोब आपले हात धुवा.आठवड्यातून एकदा तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला डिसइन्फेटिंग वाइप्सने साफ करा. या वाइप्समुळे मोबाईलच्या वरील भागावरील किटाणू मरतात.
डॉ. प्रशांत बोराडे, क्रिटिकल केअर युनिट, ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई