अवैद्यरित्या दारू विक्री करणाऱ्या १७ जणांवर गुन्हे दाखल; २५ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त


चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर आणि राज्यभरात दारू विक्रीस मनाई करण्यात आली आहे. तरीही सरकारी आदेशाचे उल्लंघन करून अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या १७ जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रोव्हिबिशन कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून २५ लाख ४८ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त व नष्ट करण्यात आला आहे.


खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत आणि त्यांचे कर्मचारी निघोजे चाकण परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांनी दोस्ती बार अँड रेस्टॉरंटवर छापा मारून विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनासह ९ लाख ११ हजार १४५ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच कुरळीगाव, म्हाळुंगे येथे छापा मारून १० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर आणि त्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी खेड तालुक्यातील पिंपळगाव येथे भाम व भीमा नदीच्या संगमाच्या काठावर बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू करण्याच्या ठिकाणी छापा मारून आठ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट केला.


गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे आणि त्यांच्या पथकाने ताथवडे परिसरात छापा मारून २७ हजार रुपयांचा हातभट्टीची दारू आणि इतर  साधने असा ऐवज जप्त व नष्ट केला.


अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या पथकाने भोसरी व एमआयडीसी भोसरी परिसरामध्ये गस्त घालत असताना भोसरी आळंदी रोडवरील संभाजीनगर येथे राज पान स्टॉलवर छापा मारून २२ हजार २० रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली.


गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या पथकाने इंद्रायणी नदीच्या किनारी एका गावठी दारूच्या भट्टीवर छापा मारून ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट केला. त्याचबरोबर विविध पोलिस ठाण्यांकडून करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये ७ लाख ८ हजार ९८६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला आहे.


संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १३२ जणांवर गुन्हा


संचारबंदीचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्या तसेच विनाकारण घराबाहेर रेंगाळणाऱ्या १३२ जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये १८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.