डांबरात अडकलेल्या श्वानाला 'शिवदुर्ग'कडून जीवदान


लोनावळा – डांबर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. ट्रकमधून डांबर रस्त्याच्या बाजूला सांडले. त्या डांबरातून जात असताना एक मादी श्वान (यापुढे ‘ती’ असे वाचावे) त्यात अडकली. श्वास घेण्यापुरतं नाक वगळता सगळं अंग डांबराने भरलं. त्याला दगड, माती, कचरा लागू लागला. वेदनांचा कल्लोळ उडाला. पण त्या मुक्या प्राण्याला साधं ओरडणं सुद्धा शक्य नव्हतं. ही बाब शिवदुर्ग टीमच्या एका सदस्याच्या निदर्शनास आली. अन त्यानंतर सगळी टीम तीच्या मदतीसाठी धावली. तब्बल चार दिवस शिवदुर्गच्या प्राणी प्रेमींनी अथक परिश्रम घेऊन तीचे सर्व डांबर काढून मोकळे केले. त्यानंतर ती आनंदाने उड्या मारत निघून गेली.


मुंबई-पुणे या लेनवर द्रुतगती मार्गावरून एक डांबराचा ट्रक जात होता. तुंगार्ली येथी त्या ट्रकला अपघात झाला आणि डांबराने भरलेला ट्रक पलटी झाला. ट्रक मधील सर्व डांबर रस्त्याच्या कडेला सांडले. सर्व खड्डे डांबराने भरून गेले. हे डांबर ओलांडताना एक श्वान त्यात अडकली आणि चिकटून बसली.नाक आणि एक बाजूचा पाठीचा थोडा भाग वगळता सर्व अंग डांबराने माखून गेले.


शिवदुर्ग रेस्क्यु टीमचे राहुल देशमुख यांना ही माहिती मिळाली. लगेचच त्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली. टीमची आवश्यकता भासल्याने त्यांनी तात्काळ टीमला बोलवले. शिवदुर्ग अॅनिमल रेस्क्यु अॅम्बुलन्स सुद्धा घटनास्थळी पोहोचली. तीच्या अंगावर खूप मोठा डांबराचा थर होता. त्याला दगड, गोटे, माती, कचरा लागलेले होते. ती एक प्राणी आहे, याची कल्पनाही करता येत नव्हती, एवढी विदारक अवस्था तीची झाली होती.


शिवदुर्गच्या सदस्यांनी तीला पोत्यावर घेऊन अॅम्बुलन्सने औंढे, लोणावळा येथील शिवदुर्ग अॅनिमल रेस्क्यु सेंटर मध्ये आणले. तात्काळ डांबर काढण्याचे काम सुरू झाले. शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या सयुक्त विद्यमाने अॅनिमल रेस्क्यू सेंटर चालवले जात आहे.मोठमोठे चिकटलेले दगड व माती हाताने काढून घेतली. नंतर डिझेल व खोबरे तेल याचे सम प्रमाणात मिश्रण करून घेतले. हे मिश्रण लावल्यावर डांबर निघून जाते व साईड इफेक्ट काहीही होत नाही. नाकाचा भाग सर्वप्रथम मोकळा करण्याचे ठरले. त्यामुळे तीचा श्वास सुरू झाला. त्यानंतर तोंड मोकळे केले. ज्यामुळे तीला खाता येऊ लागले. तोंड उघडायला लागल्यावर पाणी पाजले, खायला दिले.


त्यानंतर मलमूत्र विसर्जनाची जागा स्वच्छ केली. शरीरावर लागलेले डांबर काढणे अत्यंत जिकरीचे काम होते. शिवदुर्गचे स्वयंसेवक दररोज तासंतास तीची सेवा करीत होते. घाई, ओढाताण केल्यास अंतर्गत जखमा होण्याची दाट शक्यता असल्याने हलक्या हाताने सर्व काम केले. प्रथम तेल लावून चोळायचे आणि नंतर पाण्याने अंघोळ घालायची. ही प्रक्रिया तब्बल चार दिवस सुरू होती. टेबल, ट्रे, काम करणारे स्वयंसेवक डांबरमय झाले होते.
सुरवातीला गुरगुरणारी ती नंतर शांत राहून स्वयंसेवकांना सहकार्य करू लागली. दुसऱ्या दिवशी चार पाय मोकळे झाले व ती उभी राहायला लागली. मग तीने पळायचा प्रयत्न केला. पण डांबरामुळे पाय चिकटत असल्याने ती पळू शकत नव्हती. हा सर्व प्रकार लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी झाला. डांबर काही प्रमाणात निघाले असताना संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाले अन सगळं काही ठप्प झालं. या डांबर कन्येचे काय करायचे हा विचार सुरू झाला. त्यानंतर स्वयंसेवक वैष्णवी भांगरे हिने तीला स्वतःच्या घरी नेले. उरलेले सर्व डांबर काढून फायनल टच दिला. घरी नेल्यावर तीने एकदा रात्री हातातून सटकून धूम ठोकली. पण काही वेळाने ती परत आली. चार दिवसानंतर तीला पुन्हा तुंगार्ली येथे सोडण्यात आले. तिथे सोडल्यानंतर तीआनंदाने उड्या मारत निघून गेली.


राहुल देशमुख, प्रणय अंबूरे, विकास मावकर, अबोली वाकडकर, सुमित पिंगळे, संकेत मानकर, मंगेश केदारी, महिपती मानकर, सुनिल गायकवाड, वैष्णवी भांगरे या सदस्यांनी तीचे डांबर काढण्यास मदत केली. कोणताही प्राणी अडचणीत असेल, जखमी असेल तर शिवदुर्ग अँनिमल हेल्पलाईनवर (7522946946) यावर संपर्क करण्याचे आवाहन शिवदुर्गकडून करण्यात आले आहे.