पिंपरी - येथील भाजी मंडईत बुधवारी (दि.१५) पहाटेपासून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सुमारे दोन ते अडीच हजार नागरिकांची गर्दी झाल्याने पोलिसांची जादा कुमक मागवून सौम्य लाठीमार करून गर्दी पांगवली.
गेल्या तीन दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भाजी मंडई बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले.बंदीची ही मुदत बुधवारी संपुष्टात येत असल्याने महापालिका आयुक्तांनी एक परिपत्रक काढून बुधवारपासून सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मंडई सुरू राहणार असल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री उशिरा पुन्हा एकदा परिपत्रक काढून बुधवारी भाजी मंडई बंद राहणार असून या भाजी मंडई मोकळ्या जागेत स्थलांतरीत केल्या जातील, असे जाहीर केले.
तसेच भाजी आणि फळ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांबाबत पुढील काळात निर्णय घेतला जाईल, असेही या नवीन आदेशात म्हटले. मात्र या नवीन आदेशाची माहिती नागरिकांपर्यंत पोचलीच नाही. तर दुसरीकडे पोलिसांनी लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचे परिपत्रक काढले. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू भाजी, फळे किराना विक्री सुरू राहणार असल्याचे या परिपत्रकात म्हटले.
बुधवारी पहाटेपासून नागरिकांनी भाजी घेण्यासाठी गर्दी केली. त्यावेळी मंडईत अवघे दोनच पोलीस कर्मचारी होते. मात्र त्यांनीही याबाबत वरिष्ठांना कळविले नाही.
याबाबतची माहिती मिळाल्यावर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे स्वतः पिंपरी भाजी मंडई परिसरात आले. त्यांनी पिंपरी भाजी मंडईतील गर्दीबाबत महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना कळविले. पोलीस आयुक्तांनी याबाबत वायरलेसद्वारे सूचना केल्यावर पोलिसांची धावपळ उडाली. पिंपरी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी पिंपरी भाजी मंडईत हजर झाले. तसेच राज्य राखीव दलाच्या जवानांही पाचारण करण्यात आले.
पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक आयुक्त राम जाधव, पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे सहाय्यक निरीक्षक सुधीर चव्हाण यांनी पिंपरी भाजी मंडईत धाव घेऊन गर्दी हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दी जादा प्रमाणात असल्याने अखेर राज्य राखीव दलाच्या जवानांनाही मंडई परिसरात जाऊन गर्दी कमी करण्याचे आदेश दिले. राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी सौम्य लाठीमार केल्याने काही वेळेतच जमाव पांगला. मंडई परिसरात मोठा पोलीस बंदोस्त ठेवण्यात आला आहे.