पुणे - लॉकडाऊन काळात पुणे शहरात संकेतस्थळाच्या माध्यमातून सुरु असलेल्या हुक्का विक्रीच्या धंद्याचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले.
या कारवाईत पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून ६ हुक्का पॉट, सहा पाकीट तंबाखूजन्य फ्लेवर, चार मोबाईल फोन दोन मोपेड गाड्यांसह ८४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
मित विजय ओसवाल (वय १९ रा. वानवडी बाजार पुणे), रॉयल जयराम मधुरम (वय -२८ रा. लुल्लानगर कोंढवा) आणि परमेश महेश ठक्कर (वय २४ रा. भवानी पेठ पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
लॉकडाऊन काळात पुण्यात चक्क हुक्क्यची होम डिलिव्हरी सुरु होती. जिथं नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळणं अवघड झालंय. तिथंच ऑनलाइन हुक्का डिलिव्हरी तेजीत सुरू होती. व्हाट्स हॉट या संकेतस्थळावर ऑनलाइन हुक्का विक्री केली जात होती.
हुक्का विक्रीची जाहिरात करत मोबाईलवर संपर्क करण्याचं आव्हान केलं होतं. संपर्क करणाऱ्याला हुक्क्यची होम डिलिव्हरी केली जात होती.याबाबतची माहिती मिळताच गुन्हे शाखेने तिघांना रंगेहात पकडलं.
कोंढवा परिसरात तालाब चौक इथं सापळा रचून कारवाई केली. यावेळी हुक्का विक्रीसाठी घेऊन आलेल्या तिघांना ताब्यात घेतले. या तिघांकडून ६ हुक्का पॉट, सहा पाकीट तंबाखूजन्य फ्लेवर, चार मोबाईल फोन दोन मोपेड गाड्यांसह ८४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर या तिनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, हुक्का डिलीव्हरीच्या अनेक संकेतस्थळ उपलब्ध आहेत. या संकेतस्थळांवर विक्रेत्याचे मोबाईल नंबर देण्यात आलेत. त्याचबरोबर हजारापासून पुढं ग्राहकानुसार जास्त पैसे घेऊन हुक्का घरपोच डिलिव्हरी केला जातो. त्यामुळे अशा संकेतस्थळावर कारवाई होते का, हे पाहावे लागणार आहे.