Aarogya Setu App च्या लॉन्चिंगनंतर ४१ दिवसांमध्येच गाठला मोठा टप्पा


नवी दिल्ली– करोनाच्या लढ्यासाठी केंद्र सरकारने लाँच केलेल्या Aarogya Setu app ने तब्बल १० कोटी रजिस्टर्ड युजर्सचा आकडा केवळ ४१ दिवसांमध्येच ओलांडलाय. केंद्र सरकारने दोन एप्रिल रोजी हे अ‍ॅप लाँच केले आहे. नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी नुकतीच ट्विटरद्वारे  ही घोषणा केली आहे.


आरोग्य सेतूच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन १० कोटी युजर्सचा टप्पा ओलांडल्याची घोषणा करण्यात आली. नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. ’१० कोटी युजर्सचा टप्पा ओलांडला असून आता १०.०२ कोटी भारतीय या अ‍ॅपचा वापर करत आहेत’, असा संदेश अ‍ॅपच्या इन-अ‍ॅप बॅनरवरही दिसत आहे.


यापूर्वी, गेल्या आठवड्यातच Sensor Tower ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२० मध्ये जगभरात सर्वाधिक डाउनलोड झालेल्या अ‍ॅप्सच्या यादीत Aarogya Setu सातव्या स्थानावर पोहोचले होते. एप्रिल महिन्यात डाउनलोडिंगच्या बाबतीत आरोग्य सेतूने लोकप्रिय व्हिडिओ अ‍ॅप नेटफ्लिक्सलाही मागे टाकले. तर, झूम, टिकटॉक, फेसबुक,व्हॉट्सअ‍ॅप,इंस्टाग्राम आणि मेसेंजर हे टॉप सहा अ‍ॅप्स ठरले.


आरोग्य सेतू अ‍ॅप करोना व्हायरसच्या धोक्यापासून युजरला अलर्ट करतं. हे अ‍ॅप संपर्क ट्रेसिंगद्वारे आणि युजर्सच्या ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीद्वारे त्याच्याभोवती करोना संक्रमित असेल तर त्याची माहिती देते. याशिवाय या साथीच्या आजाराशी संबंधित बरीच महत्त्वाची माहितीही दिली जाते.


करोना संसर्गापासून बचाव आणि लक्षणांचीही माहिती मिळते. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. दरम्यान, सरकारकडून सर्व खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या अ‍ॅपचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.