कोरोना संकटातून एकजुटीने महाराष्ट्राला बाहेर काढू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई – कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करूत असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्याने एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रसार रोखला होता, आता मे अखेरपर्यंत आपणास ही साथ वाढू द्यायची नाही. सर्वांनी सहकार्य केल्यास यात यश येईल असेही ते म्हणाले. ते आज विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते.


यावेळी सहभागी झालेल्या नेत्यांनी कोरोना विषयक लढ्यात आम्ही राज्य शासनाबरोबर आहोत असे ठामपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वाना विश्वासात घेतल्याबध्दल समाधान व्यक्त केले. 


यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे मंत्रालयातून तर मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून तर इतर नेते राज्याच्या विविध जिल्ह्यातून सहभागी झाले होते.


मुख्यमंत्री म्हणाले की, आज कोरोनाशी मुकाबला करीत असतांना आपल्याला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. ही अभूतपूर्व परिस्थिती असल्याने केवळ आपले राज्यच नव्हे तर देश आणि जगही यात होरपळले आहे. माझे आपल्याशी मधून मधून दूरध्वनीवरून बोलणे सुरूच असते. आपल्या सुचना मी ऐकत असतो. माध्यमांतून वाचत असतो. त्या योग्य असतील तर लगेच प्रशासनाला कळवीत असतो.


केंद्र सरकार सुद्धा यात आपल्याला खूप सहकार्य करीत आहे. मग ते पंतप्रधान, गृहमंत्री, असो किंवा केंद्रीय आरोग्य मंत्री असो. पंतप्रधान मार्गदर्शनासाठी सहजपणे उपलब्ध असतात. तसेच आत्तापर्यंत आम्हा मुख्यमंत्र्यांची आणि त्यांची व्हीसीद्वारे बैठकही झाली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण प्रसंगी टीका करीत असताल पण त्यात आपला उद्देश उणीवा निदर्शनास आणून शासनाला सुचना करणे असा असतो.


आपण केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात रुग्ण संख्या वाढली नाही मात्र मेअखेरीपर्यंत आपल्याला अजून काळजी घ्यायची आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढते आहे मात्र बीकेसी, वरळी, रेसकोर्स अशा ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावर विलगीकरण केंद्रे उभारली आहेत. आपण चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे.व्हेंटीलेटर्सपेक्षा ऑक्सिजनची गरज आहे. परराज्यातील नागरीकानाही पुरेशी काळजी घेऊन आम्ही पाठवत आहोत. राज्यांतर्गत लोकांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी व्यवस्थित काळजी घेण्यात येईल जेणे करून ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये धोका वाढणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.केंद्रीय संस्था , लष्कर, पोर्ट ट्रस्ट, यांना आम्ही आयसीयु बेड्स उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. मुंबईतून देखील परराज्यातील कामगार नेण्यासाठी रेल्वे सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे अशी माहितीही त्यांनी दिली. मालेगाव व औरंगाबाद येथे कंटेनमेंट झोन्स मध्ये अधिक शिस्त ठेवण्याची गरज आहे, तेथील लोक प्रतिनिधीनी सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली.


पिक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेला विनंती – उपमुख्यमंत्री


उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांना आपल्या कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पिक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेशी बोलणे सुरु आहे. बियाणे व खरीप हंगाम व्यवस्थित मार्गी लावावा म्हणून चांगले नियोजन केले आहे. कुठेही औषधे, बियाणे कमी पडणार नाही कापूस खरेदीसंदर्भात केंद्राशी बोलणे सुरु आहे. ज्वारी आणि मका घेण्यासंदर्भात केंद्राने आदेश काढले आहेत. २५ हजार मेट्रिक टन ज्वारी आणि १५ हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्यात येणार आहे अशी माहिती दिली.


नेत्यांनी केल्या विविध सूचना
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानून काही सूचना केल्या. मुंबई आणि राज्यातील आरोग्य परिस्थितीवर अधिक लक्ष देण्याची गरज असून रुग्णालय व्यवस्थापन ठीक करण्याची गरज आहे असे सांगितले. गंभीर रुग्णांना सेवा मिळाली पाहिजे तसेच आजारी पडणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी नियोजन करावे लागेल असे सांगितले. कोव्हीड नसलेल्या रुग्णांना उपचार मिळणे, रुग्णाना बेड्सची व इतर माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून मिळावी. रुग्णांचे इतर संपर्क मोठ्या प्रमाणावर शोधले पाहिजे. तसेच प्रशासनात समन्वय हवा तो घडवून आणणे महत्वाचे आहे असे सांगितले. परराज्यातील २०-२५ हजार श्रमिक पायी घरी निघाल्याचे चित्र आहे. केंद्राला अधिकाधिक रेल्वे मागितल्या पाहिजेत. पोलिसांचे नैतिक बळ वाढवावे, त्यांच्यातही कोरोना वाढतोय, त्यांना पुरेसे संरक्षण मिळावे, असे ते म्हणाले.


आपली अर्थव्यवस्था सुरु करताना क्षेत्रनिहाय तज्ञांचे गट करावेत आणि गटनिहाय विविध उद्योग, व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करावा. विरोधी पक्ष म्हणून आम्ही पूर्णपणे पाठीशी आहोत. आमच्याकडून राजकारण होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की उपचार न झाल्याने रुग्णांचा मृत्यू होत असेल तर ते चुकीचे आहे. कोरोनाची चाचणी तो रुग्ण मरण पावल्यावर येतोय. क्वारंटाईटन केंद्रांमध्ये अधिक सुविधा द्याव्यात. त्यांना भोजन मिळावे यासाठी आढावा घ्यावा असे सांगून ते म्हणले की, शेतीमाल, आंब्याला, भाजीपाल्याला बाजारपेठ नाही,त्यामुळे मार्केटिंगची व्यवस्था करावी. असंघटित कामगार, मोलकरणी यांच्या उत्पन्नाची शाश्वतीनाही, त्यांना आधार द्यावा. मोडकळीस आलेल्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी परवानगी द्यावी, कोकणातल्या लोकांसाठी विशेष रेल्वे सोडाव्यात, मालमत्ता कर, उपकर स्थगित करावा अशा मागण्याही प्रवीण दरेकर यांनी केल्या.


मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, कंटेनमेंट झोन्सच्या ठिकाणी पोलीस बळ वाढवावे लागेल. पोलीस थकले आहेत. त्यामुळे एसआरपी फौज आवश्यक आहे. पोलिसांना लोकही गृहीत धरताहेत. अनेक ठिकाणी छोटे दवाखाने बंद आहेत. रुग्णांचे हाल होत आहेत. ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तरुण अडकेल आहेत त्यांच्या घरी जाण्याव्ची व्यवस्था व्हावी. परप्रांतीय कामगार आज ना उद्या परत येतील तेव्हा त्यांच्या तपासणीची व्यवस्था करावी लागेल. आता परत राज्यात परतणाऱ्या परराज्यातील श्रमिक आणि कामगारांची स्थलांतरित कायद्यान्वये नोंदणी करावी तसेच यापुढे लॉकडाऊन करतांना आगाऊ सुचना द्यावी असेही राज ठाकरे म्हणाले.


शेकापचे आमदार जयंत पाटील म्हणाले की, शेतीसाठी पिक कर्ज व्यवहार ठप्प आहे, बँकांना सुचना करावी व शेतीला प्राधान्य देऊन शेतीवर आधारित उद्योगांना मदत करावी


बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यावेळी म्हणाले की, पालघर रेड झोन मध्ये आहेत पण याठिकाणी आदिवासी भाग आहे त्यांचे हाल होत आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. बांधकामे बंद आहेत. पावसाला सुरुवात झाली तर सिमेंटचा साठा खराब होईल.सकाळ,संध्याकाळ लोकल ट्रेन्स काही प्रमाणात तरी सुरु झाल्या पाहिजेत राज्य शासनाचे काम चांगले सुरु आहे असेही ते म्हणाले.


वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कापूस खरेदी थांबवू नये, रब्बीचे पिक शेतकऱ्याच्या घरात आहे. ते एपीएमसीने विकत घ्यावे. अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करतांना शेतीकडे लक्ष द्या, कोणाचाही पगार कपू नका.रिक्षा, हातगाड्या, घेतलेल्यांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. ते पुनर्गठीत करावेत. दुकाने उघडायला लावली आहेत. मजुरांना कमीतकमी वेतन दिलेच पाहिजेत ही मागणी त्यांनी केली. परीक्षा होणार की नाही ते स्पष्ट करावे, कुंभार समाजाकडे मातीचे रॉयल्टी मागू नये. नाभिक समाजाला देखील दिलासा मिळावा असे ते म्हणाले.


एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील. यावेळी म्हणाले की, नॉन कोव्हीड रुग्णांकडे दुर्लक्ष करणे सुरु आहे. औरंगाबादमधील तीन मोठ्या खासगी रुग्णालये मोठ्या प्रमाणावर पैसे आकारतात.


अधिकाऱ्यांत समन्वय अभाव आहे. मनपातर्फे ४ कोटी रुपये खर्चून रुग्णालय बांधण्यात आले आहे पण तिथे काम करण्यासाठी मुंबईच्या तुलनेत अतिशय कमी पगार असल्याने विशेषज्ञ डॉक्टर्स तयार नाहीत. १४ कोटी रुपये खर्चून घाटीची इमारत बांधून तयार आहे पण मनुष्यबळ नाही. मालेगावात सर्व मिल कामगार आहेत. त्यांच्याकडे रेशन कार्ड्स नाही म्हणून त्यांना धान्य मिळत नाही असेही ते म्हणाले. दारू दुकाने उघडण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा होता असे सांगून जलील यांनी आम्ही राज्य शासनाबरोबर आहोत अशी ग्वाहीही दिली.


माकपाचे अशोक ढवळे म्हणाले की कष्टकरी जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग या शब्दाऐवजी शारीरिक अंतर हा शब्द वापरावा असे ते म्हणाले. सपाचे अबू आझमी म्हणाले की प्रत्येक रुग्णालयात नॉन कोव्हीड रुग्णांना उपचार मिळावेत. डायलेसीस रुग्णांचा प्रश्न मिटावा.परराज्यातील श्रमिकांना घरी पाठविण्याची जबाबदारी पोलिसांकडे देऊ नये. एक वेगळा सामाजिक संस्थांचा गट करून त्यांच्याकडे जबाबदारी द्यावी. भाकपचे प्रकाश रेड्डी यांनी सांगितले की कामगार विभाग जास्त कार्यरत केला पाहिजे.


रेल्वेशी चांगला समन्वय ठेऊन काम करावे *माकपचे मिलिंद रानडे* यांनीही सुचना मांडल्या.


पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा जोगेंद्र कवाडे म्हणाले, बारा बलुतेदार यांना उत्पन्नाचे साधन मिळवून द्यावे. बाहेर कोरोनाने मृत्यू आणि आतमध्ये उपाशी राहिल्याने मृत्यू असे होऊ नये. परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्यापर्यंत पोहचविण्यासाठी मुंबई, कुर्ला, मुंबई सेन्ट्रल , दादर येथून रेल्वेचे नियोजन करावे.


राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रिपाईचे डॉ राजेंद्र गवई, जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे यांनीही आपल्या सूचना मांडल्या.