लोहारे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य देणार पदाचे राजिनामे

ठेकेदाराने पत्रकारांमार्फत केलेल्या बदनामीने कंटाळून घेतला निर्णय?


समीर साळुंखे यांचा मंडप न बांधून दिल्यास उन्हात उपोषणाचा निर्धार


ठेकेदाराने पत्रकारांमार्फत सततची बदनामी केल्याने संत्रस्त झालेले लोहारे ग्रामपंचायतीचे सरपंच किसन पारकर,उपसरपंच शिवराम मारूती पवार, आणि सदस्यांनी पदाचे सामूहिक राजिनामे देण्याची भूमिका मांडली


पोलादपूर प्रतिनिधी - तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोहारे ग्रामपंचायत गेल्या काही दिवसांपासून एका ठेकेदाराने त्याच्या गैरकृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी वेठीस धरून काही पत्रकारांमार्फत सतत बदनामी करण्याचा प्रकार चालविल्याने लोहारे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य पदाचे राजिनामे देणार असल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस भेटून सांगितले. दरम्यान, या सर्व घटनाक्रमांमध्ये प्राथमिक शाळेच्या इमारतीचे बांधकाम करणारे ठेकेदार समीर साळुंखे यांनी पोलादपूर पंचायत समितीने 16 मार्च 2020 रोजी उपोषण करण्याचा इशारा देताना उपोषणस्थळी संबंधित कार्यालयाने मंडप न बांधून दिल्यास भरउन्हात उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


यावेळी प्रस्तुत प्रतिनिधींच्या निवासस्थानी सरपंच किसन दगडू पारकर, उपसरपंच शिवराम मारूती पवार, मीना संदेश निकम, निलेश संभाजी साळुंखे, ललिता संदीप जाधव, सुरेश विठोबा सुतार, वैशाली विनोद निकम, संजय पांडूरंग सकपाळ, आणि सुजाता राकेश साळुंखे यांनी सामूहिकरित्या भेटून गेल्या काही महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराने महाड आणि पोलादपूर तालुक्यातील काही पत्रकारांना हाताशी घेऊन कथित भ्रष्टाचाराच्या बातम्यांद्वारे ग्रामपंचायत आणि लोहारे गांव बदनाम करून स्वत केलेल्या गैरप्रकारांकडे दूर्लक्ष करण्यासाठी मोठया प्रमाणात बदनामीसोबत दबावतंत्र अवलंबिले आहे,अशी माहिती दिली.


यावेळी सरपंच किसन पारकर यांनी, सरपंच आणि सर्व सदस्य लोहारे गावाने बिनविरोध निवडून दिलेले असून गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असताना समीर साळुंखे या ठेकेदाराने लोहारे ग्रामपंचायतीच्या ठरावाखेरिज प्राथमिक शाळेच्या मोडकळीस आलेल्या इमारतीचे बांधकाम करताना आधीच्या इमारतीचे वासे आणि अन्य जुने सामान परस्पर विक्री केल्यानंतर याच इमारतीबाबत काही चॅनेलच्या पत्रकारांना हाताशी घेऊन प्रसिध्दी मिळवित कामाचा गाजावाजा मोठया प्रमाणात केला, असल्याचे मत व्यक्त करून पोलादपूर पोलीस ठाणे, पोलादपूर गटविकास अधिकारी आणि सर्व संबंधित अधिकारी व कार्यालयांना समीर साळुंखे यांनी उपोषणास बसण्यासंदर्भात दिलेल्या निवेदनानुसार त्यांना उपोषणास बसण्याची परवानगी नाकारावी, असे आवाहन करणारे सरपंच व सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र प्रसिध्दीस दिले.


यानंतर ग्रामपंचायतीमार्फत सदरच्या कामातील सामानाची परस्पर विक्रीबाबत चौकशी लागू नये, यासाठी सातत्याने माहितीचा अधिकार आणि तक्रारी अर्ज करून सर्वांना वेठीस धरून सप्टेंबर 2019 पासून त्रास देण्यास सुरूवात केली असून यासंदर्भात ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने सातत्याने समीर साळुंखे यांना सातत्याने सकारात्मक प्रतिसाद देत चर्चा व बैठका करूनही त्यांनी काही अंतस्थ हेतू ठेऊन ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यासह सर्व सदस्यांना वेठीस धरून दबावतंत्र सुरूच ठेवले असे या सर्वांचे म्हणणे आहे.


काही दैनिकांमध्ये स्थानिक पत्रकारांना हाताशी घेऊन ठेकेदार समीर साळुंखे अत्यल्पविक्री होणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये लोहारे ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगांतर्गत विकास कामे दर्जाहिन असल्याचा आरोप करून पुनर्मूल्यांकनाची मागणी करीत कथित भ्रष्टाचाराविरोधात 16 मार्च उपोषणास बसणार असल्याच्या इशाऱ्याच्या बातम्या सोशलमिडीयावरून व्हायरल केल्या. परिणामी, संबंधित ठेकेदाराची कृत्य जनतेसमोर आणण्याऐवजी पोलादपूर तालुक्यासह सर्वत्र लोहारे ग्रामपंचायतीची मोठया प्रमाणात बदनामी करण्याचे काम काही पत्रकारांनी मोठया प्रमाणात केले. त्यापैकी दोन चॅनेलच्या पत्रकारांनी दोन लाखांची मागणी करूनही प्रत्यक्षात बातमी न देता तोडपाणी केल्याच्या वृत्ताला संबंधित ठेकेदाराने दुजोरा दिला आहे. मात्र, यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनामध्ये पोलादपूर पंचायत समितीच्या प्रांगणात 15 मार्चपासून उपोषणास बसण्यासाठी संबंधित कार्यालयाने मंडप व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली असून तसे न केल्यास भरउन्हातच उपोषण करण्याचा इशाराही यावेळी समीर साळुंखे यांनी दिला आहे.


यासंदर्भात लोहारे ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी सामूहिक राजिनामे देऊन संबंधित बदनामीकारक मजकूर व्हायरल करून दबावतंत्र अवलंबिणाऱ्यांनीच ग्रामपंचायतीचा कारभार चालवावा, असे आव्हान देत पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार देऊन संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.