ठाण्याच्या चिखलवाडीचा चिखल दूर होणार


पूर्वद्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे पूल रुंदीकरणात भूमिगत मलवाहिन्या रुंदीकरण एमएमआरडीए आणि
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून करणार - ना.एकनाथ शिंदे


प्रतिनिधी ठाणे : भूमिगत मलवाहिन्या अरुंद असल्याने ठाणे पश्चिमेकडील उच्चभ्रू परिसर असलेला नौपाडा भागातील भास्कर कॉलनी,चिखलवाडी गेली 15 वर्षे पावसाळ्यात बुडत आहे. तसेच,सद्यस्थितीत एमएमआरडीएमार्फत सुरु असलेल्या कोपरी रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाच्या कामामध्ये येथील महामार्गाखालील भूमिगत मलवाहिन्याचेही रुंदीकरण करावे.याबाबतची मागणी भाजपच्या स्थानिक नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांनीदेखील राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.त्याची दखल ना.शिंदे यांनी घेत शनिवारी येथील कामाची पाहणी करून ठाणे महापालिका आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून भूमिगत वाहिन्यांचे रुंदीकरण केले जाईल.असे स्पष्ट केले.


ठाणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या नौपाड्यातील भास्कर कॉलनीमध्ये चिखलवाडी हा झोपडपट्टीबहुल भाग आहे.या परिसरातील सांडपाणी व पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पूर्वद्रुतगती महामार्गाखालून भूमिगत मलवाहिन्या जोडण्यात आल्या आहेत.य परिसरातून एकूण तीन वाहिन्या रस्त्यापलीकडील ज्ञानसाधना महाविद्यालय परिसरातील नाल्याला जोडलेल्या आहेत.या वाहिन्या अरुंद असून ही यंत्रणा अपुरी पडत असल्याने,दरवर्षी पावसाळ्यात हा परिसर जलमय होतो.गेली 15 वर्षांपासून अतिवृष्टी झाल्यानंतर येथील घरे 5 ते 10 फूट पाण्याखाली असतात.त्यामुळे येथील रहिवाशी मेटाकुटीस आले असून सातत्याने मालमत्तेचे नुकसान,विद्युतप्रवाह खंडित होत असल्याने रोगराईचा सामना करीत पावसाळा ढकलावा लागतो.सुमारे 500 ते 1000 कुटुंबे यामुळे प्रभावित होतात.तेव्हा,सद्यस्थितीत एमएमआरडीएमार्फत कोपरी रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने येथील महामार्गाखालील पाणी व ड्रेनेजचा निचरा करणाऱ्या छोट्या नाल्यांचे रुंदीकरण करावे.अशी मागणी स्थानिक भाजप नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता.29 फेब्रु.) या परिसराची पाहणी ना.एकनाथ शिंदे यांनी केली.यावेळी महापौर नरेश म्हस्के,स्थानिक नगरसेविका प्रतिभा मढवी,भाजप उपाध्यक्ष डॉ.राजेश मढवी,एमएमआरडीएचे मुख्य अभियंता निमसे आणि महापालिकेचे अधिकारी प्रवीण पापळकर,रामकृष्ण कोल्हे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना ना.शिंदे यांनी,गेली अनेक वर्षे येथील नागरिक नरकयातना सोसत आहेत.दर पावसाळ्यात पाणी तुंबत असल्याने महापालिकेच्या वतीने मोटर पंप आणि बोटींची व्यवस्था करावी लागते.तेव्हा,ही समस्या कायमची संपवण्यासाठी एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए.राजीव आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.त्यानुसार,भूमिगत मलवाहिन्याचे रुंदीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.दोन्ही प्राधिकरणे समन्वयाने काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


अडथळ्यांवर मात करण्याचे आव्हान
नौपाड्यातील चिखलवाडी ही वस्ती शहराच्या मध्यवर्ती भागात आहे.पूर्वद्रुतगती महामार्गानजीक हा परिसर असून येथील रस्त्याखालून सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पम्पिंग स्टेशन व चिखलवाडी येथून भूमिगत गेलेल्या तीन अरुंद वाहिन्या आहेत.त्यात कचरा अथवा चिखल रुतल्यास नौपाडा भास्कर कॉलनी,मानस सोसायटी,प्रभात सोसायटी,दीपश्री सोसायटी,पंपिंग स्टेशन,भांजेवाडी,तबेला,चिखलवाडी आणि ब्राम्हण सोसायटीचा काही परिसरात पावसाचे पाणी तुंबते.याचठिकाणी मुंबई महापालिकेच्या जलवाहिन्या आणि भारत पेट्रोलियमच्या डिझेल व गॅस वाहिन्या असल्याने नाला रुंदीकरणाचे काम करताना एमएमआरडीए व ठाणे महापालिका प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे.


एमएमआरडीए व महापालिकेचा समन्वय  
पूर्वद्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे पुलाच्या कामासाठी सध्या हा रस्ता खोदलेला आहे.तेव्हा,भूमिगत नाल्याचे रुंदीकरण करणे शक्य होणार आहे.यासाठी ठाणे महापालिका आणि एमएमआरडीए प्रशासन समन्वयाने काम करणार आहे.एमएमआरडीएमार्फत हे काम पूर्ण करून घेण्यात येणार असून त्यासाठी लागणारा निधी ठाणे महापालिकेकडून वर्ग करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत.
- ना.एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री