राज्यसभा द्विवार्षिक निवडणुकीसाठी विधानभवनात नियंत्रण कक्ष


मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांद्वारे घेण्यात येणाऱ्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगामार्फत घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार दि. २६ मार्च, २०२० रोजी मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दि. ६ मार्चपासून विधानभवनात २४ तास नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात येत आहे.

या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम दि. ६ मार्चपासून सुरू होत आहे. नामनिर्देशन पत्र सादर करावयाची मुदत दि. १३ मार्च, २०२० पर्यंत आहे; आवश्यक असल्यास दि. २६ मार्च, २०२० रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने विधानभवनातील कक्ष क्रमांक ०२२, तळ मजला, विधानभवन, मुंबई-४०० ०३२ या ठिकाणी हा नियंत्रण कक्ष असणार असून निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होण्याचा दिनांक ६ मार्च, २०२० पासून निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत २४x७ तत्वावर कार्यान्वित राहील.

या निवडणुकीमध्ये मतदाराचे मत मिळवण्याच्या दृष्टीने त्याला रोख रक्कम किंवा वस्तू देऊन अनुचित प्रभाव निर्माण करणे, मुक्तपणे मताधिकार वापरताना मतदारांना कोणत्याही प्रकारच्या धमक्या देणे, जबरदस्ती करणे, मतदानामध्ये फायद्यासाठी राज्य यंत्रणेचा गैरवापर करणे, संबंधित मतदान अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांची यांची पक्षपाती वृत्ती किंवा अयोग्य वागणूक यांचा मतदानाच्या योग्यतेवर होणारा प्रतिकूल परिणाम आदींसंदर्भात तक्रार असल्यास नियंत्रण कक्षात सादर करावी, असे आवाहन महाराष्ट्र विधानमंडळाचे उपसचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विलास आठवले यांनी केले आहे