रुग्णालयात शिरलेल्या जमावाकडून वैद्य. अधिकारी डॉ. डांगे यांना धक्काबुक्की


मालेगांव : काल रात्री ८ वाजेच्या सुमारास मालेगांव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती मो. ईस्माईल यांच्या समवेत संचारबंदी असतांना आलेल्या सुमारे २० ते २५ राजकीय कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलचे वैद्यकिय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांच्या शी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला.
रात्री ८ वाजता, सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या दोघा संशयीत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. सामान्य रुग्णालय पुर्ण क्षमतेने कार्यरत असतांना आमदार मौलाना मुफ्ती मो. ईस्माईल हे रुग्णालयात आले. यावेळी त्यांच्या समवेत सुमारे २० ते २५ राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते. ते आले आणि वैद्यकिय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांच्या दालनात शिरले. तेथे त्यांनी आरडाओरड व मोठमोठ्या आवाजात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यामुळे   रुग्णालयातील इतर महिला व पुरुष डॉक्टर्स, वॉर्डबॉय, नर्सेस भयभीत झाल्यात.


आमदारांसोबतच्या काही कार्यकर्त्यांनी यावेळी डॉ. डांगे, डॉ. पाटील यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. या मुळे भयभीत झालेल्या रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी काम बंद करुन रुग्णालयासमोर ठिय्या मांडून होत असलेल्या अन्यायाविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली. हा सर्व प्रकार यावेळी रुग्णालयात बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांदेखत झाला. आ. मौलाना व त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या दहशतीपुढे ते ही काही करु शकले नाही.


कोरोना चे संशयीत रुग्ण रुग्णालयात दाखल असतांना तसेच संचारबंदीचा आदेश असतांना आमदार महोदयांसमवेत इतका मोठा जमाव रुग्णालयात घुसतोच कसा असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. या प्रकारानंतर उशिरा वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी परिस्थीती हाताळली. रात्री उशिरापर्यत पोलीस कारवाई सुरु होती.


https://youtu.be/75kjFwqaEP8