‘मी अत्रे बोलतोय’च्या दुसऱ्या आवृत्तीचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन


मुंबई : एकपात्री सादरीकरण ही कला हळुहळू लुप्त होत चालली आहे. ही कला सादर करणारे नवनवे कलाकार तयार झाले पाहिजे. ‘मी अत्रे बोलतोय’ या एकपात्री नाट्य प्रयोगाद्वारे दिवंगत कलाकार सदानंद जोशी यांनी आचार्य अत्रे यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविले. पुस्तकरूपाने ‘मी अत्रे बोलतोय’ वाचकांसमोर येत असताना सदानंद जोशी यांची एकपात्री सादरीकरणाची कला देखील जगविण्याची गरज आहे व त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.

सदानंद जोशी यांच्या ‘मी अत्रे बोलतोय’ची नाट्यसंहिता व एकपात्रीचा इतिहास थोडक्यात सांगणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १३) राजभवन, मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, संत तुलसीदास हे संत आपल्या लोकोत्तर ग्रंथांच्या माध्यमातून अमर झाले, तसेच आचार्य अत्रे, सदानंद जोशी आपल्या प्रतिभासंपन्न कार्यामुळे व कलेमुळे लोकमान्य झाले. सदानंद जोशी यांच्याप्रमाणे एकल सादरीकरणाची कला अवगत असलेले अनेक कलाकार समाजात आहेत, परंतु त्यांच्या प्रतिभेला वाव मिळत नाही. असे कलाकार समाजापुढे आणणे ही आचार्य अत्रे व सदानंद जोशी यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

सदानंद जोशी यांच्या स्नुषा तसेच दूरदर्शनच्या वृत्त निवेदिका शिवानी जोशी यांनी संपादित केलेल्या आणि व्यास प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला आमदार आशिष शेलार, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे, काव्यप्रेमी - सादरकर्ते विसुभाऊ बापट, दूरदर्शनचे वृत्तनिवेदक सादरकर्ते शैलेश पेठे आदी मान्यवर उपस्थित होते. व्यास क्रीएशनचे निलेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.