अयोध्या: राम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी आज अयोध्येला भेट दिली. मिश्र यांच्या भेटीनंतर मंदिर निर्मितीवरील चर्चेने जोर पकडला आहे. शनिवारी सदस्यांसोबत मिश्र यांनी दोन तास मंदिर परिसरात घालवून विविध मुद्यांवर चर्चा केली. दरम्यान, मंदिर निर्मितीचे टप्पे कोणते यावर सध्या चर्चा सुरू असून त्या दिशेने अभ्यास केला जात आहे अशी माहिती ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी सांगितले. रामनवमीच्या उत्सवासाठी अयोध्येत १५ ते २० लाख लोक येत असतात. या भाविकांनी दर्शन घेऊन, पूजन करून आपापल्या घरी सुखरूप जावे असे आम्हाला वाटते. आणि भाविकांची सोय पाहणे हे आपले पहिले कर्तव्यच असल्याचे राय यांनी सांगितले. या नंतर येत्या राम नवमीलाच मंदिर निर्मितीचा शुभारंभ केला जाईल असे बोलले जात आहे. हे महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी एक-एक पाऊल कसे टाकायचे, आणखी कोणती कामे करावी लागणार हे अजून निश्चित केले जात आहे, असे महामंत्री चंपत राय यांनी सांगितले.
राम मंदिर निर्मितीचे काम राम नवमीपासून सुरू होणार?